कोल्हापुरी जिगर अन्‌ चाळीस वर्षांची जिगरी दोस्ती...! 

संभाजी गंडमाळे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

रोज सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत झपाटल्यागत काम करतो. दिवसभर कामाच्या निमित्ताने दोघांत वारंवार वाद होतात; पण ते काम अधिक चांगले झाले पाहिजे, यासाठी असतात. अर्थात जे काही करायचं ते सर्वोत्कृष्ट, हाच आमच्या मैत्रीचा मुख्य धागा आहे. दोघांनाही अनेक अडचणी आल्या; पण एकमेकांना आधार देत सावरलो आणि घट्ट पाय रोवून उभे राहिलो, असेही पाटील व सावनूर सांगतात.

कोल्हापूर : तब्बल चाळीस वर्षांची नर्सरीपासूनची जिगरी दोस्ती. तितकीच जिगर त्यांनी पणाला लावली आणि बॉलीवूडचे चित्रपट व मोठ्या बॅनर्सना स्पेशल इफेक्‍टस्‌साठी थेट येथील स्टुडिओत आणले. 'भाग मिल्खा भाग', 'एक था टायगर', 'सुलतान' असो किंवा अकरा ऑगस्टला प्रदर्शित होणारा अक्षयकुमारचा 'टॉयलेट-एक प्रेमकथा' या चित्रपटांना त्यांनी व्हिज्युअल इफेक्‍टस्‌ दिले आहेत. अष्टविनायक मीडिया अँड एंटरटेन्मेंटचे संग्राम पाटील, आश्‍विन सावनूर 'सकाळ'शी मैत्रीचे धागे उलगडत होते. मात्र, त्याचवेळी दुबईतील एका कंपनीच्या टीमबरोबरच्या मीटिंगवरही लक्ष ठेवून होते. 

कलापूर कोल्हापुरात सर्वच प्रांतांत अनेक जण यशोलौकिकाचे शिलेदार ठरले. मात्र, पाटील आणि सावनूर या जोडगोळीने अगदी ठरवून नवे क्षेत्र निवडले आणि अनेक अडचणींवर मात करीत त्यात ते यशस्वी झाले. 

रिलायन्स मीडिया, टाटा एलेक्‍सी, यशराज फिल्म (वायआरएफ), शाहरूख खानची रेड चिलीज्‌, अफ्टर्स, अजय देवगणच्या वीएफएक्‍सवाला या कंपन्यांबरोबर 'अष्टविनायक'चे करार झाले आहेत. 

श्री. पाटील म्हणाले, ''आम्ही दोघेही एकाच शाळेत. पुढे दहावीनंतर कॉलेजं बदलली; पण कॉलेज सुटले की घरी एकत्रच यायचो. आश्‍विनला नॉनव्हेजची आवड आणि मला इडलीची. त्यामुळे नॉनव्हेज खायला तो आमच्या घरी आणि इडली खायला मी त्यांच्या घरी असा कित्ता ठरलेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंगची कामे सुरू केली आणि आश्‍विन मुंबईतच मोठ्या स्टुडिओमध्ये काम करू लागला. मला बिलं आणि इतर कामांच्या निमित्ताने मंत्रालयात जावे लागायचे. त्या वेळी हमखास संध्याकाळी सातला आमची भेट ठरलेली असायची. त्याचे काम बघून मलाही इंटरेस्ट निर्माण झाला आणि आम्ही मुंबईतच फ्लॅटच्या एका खोलीत बसून छोट्या जाहिराती आणि ब्रॅंडिंगची कामे सुरू केली.'' 

पुढचा प्रवास श्री. सावनूर उलगडतात. ते सांगतात, ''खऱ्या अर्थाने आम्हाला टर्निंग पॉईंट मिळाला तो 'साम' वाहिनीच्या कामामुळे. हे काम यशस्वी केले आणि आम्ही मग मागे कधीच वळून पाहिले नाही. मुंबईतून थेट कोल्हापुरात येऊन स्टुडिओ सुरू केला. देशभर फिरलो आणि कामे मिळवली. एडिटिंग, व्हिज्युअल इफेक्‍टस्‌, ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन, ब्रॅंडिंग आणि प्रशिक्षण या सर्व सेवा एकाच छताखाली असणारी पुणे आणि बंगळूरपासून मध्यवर्ती अशी 'अष्टविनायक' एकमेव संस्था आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक साठ तरुणांना येथे रोजगार मिळाला आहे.'' 

झपाटून काम... 
रोज सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत झपाटल्यागत काम करतो. दिवसभर कामाच्या निमित्ताने दोघांत वारंवार वाद होतात; पण ते काम अधिक चांगले झाले पाहिजे, यासाठी असतात. अर्थात जे काही करायचं ते सर्वोत्कृष्ट, हाच आमच्या मैत्रीचा मुख्य धागा आहे. दोघांनाही अनेक अडचणी आल्या; पण एकमेकांना आधार देत सावरलो आणि घट्ट पाय रोवून उभे राहिलो, असेही पाटील व सावनूर सांगतात.

Web Title: marathi news marathi website Kolhapur News Friendship Day