अवयवदानाचा टक्का वधारतोय..! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : दातृत्वाचा अखंड झरा वाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही आता अवयवदानाचा टक्का वधारतो आहे. शासनाच्या अवयवदान मोहिमेंतर्गत पाच हजारांहून अधिक कोल्हापूरकरांनी मरणोत्तर अवयवदानासाठी नोंदणी केली आहे.

गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेल्या जनजागृतीतून 'मरावे परी अवयवरूपी उरावे' ही मानसिकता बळावली आहे. दरम्यान, पूर्वी मुंबईत सर्वाधिक अवयवदान व्हायचे. मात्र, आता पुण्याने राज्यात बाजी मारली असून, जूनपर्यंतच्या पहिल्या सहा महिन्यांत पुण्यात सर्वाधिक 27 जणांनी, तर मुंबईत 22 जणांनी मरणोत्तर अवयवदान केले आहे. 

पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांतील काही रुग्णालयांना अवयवदानाची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयांमधून होणारे अवयवदान योग्य आणि गरजू रुग्णांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी पुण्यातील झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी)वर सोपविण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षभरात 132 पैकी पुणे 'झेडटीसीसी'तर्फे 59 जणांनी यात अवयवदान केले आहे. जूनअखेर पहिल्या सहा महिन्यांत 36 मूत्रपिंड, 26 यकृत आणि सहा हृदय इतके अवयवदान झाले. कोल्हापूर आणि नाशिक येथूनही अवयवदान होत आहे. अवयवदानाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे हे शक्‍य होत आहे. 'झेडटीसीसी'च्या समन्वयक आरती गोखले यांनी ही माहिती दिली. 

गरजूंची प्रतीक्षा यादी एका क्‍लिकवर 
मूत्रपिंडापासून हृदयापर्यंत किती रुग्ण नव्या अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत, याची माहिती आता एका क्‍लिकवर उपलब्ध झाली आहे. 'झेडटीसीसी'ने या मोबाईल ऍपसाठी पुढाकार घेतला. पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आदी ठिकाणच्या वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना हे ऍप दिले आहे. या ऍपवरील माहितीनुसार सध्या 600 हून अधिक मूत्रपिंड, 200 हून अधिक यकृत आणि पाच जण नव्या हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. 

आज कार्यक्रम 
येथील (कै.) अनिल तेंडुलकर फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त उद्या (ता. 13) 'द बर्निंग स्टोरी' या माहितीपटाचे प्रदर्शन होणार आहे. कार्यक्रमात अवयवदान केलेल्या व्यक्तींचा गौरव होईल. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाचला कार्यक्रम होणार आहे.

Web Title: marathi news marathi website Kolhapur News Organ Donation