एसटी चिखलात रुतली, अपघात टळला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

दोडामार्ग : आंबेली येथील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कोल्हापूरहून पणजीकडे जाणारी एसटी बस गटारालगतच्या घळणीला धडकून चिखलात रुतली. बसमध्ये 35 प्रवासी होते; मात्र कुणीही जखमी झाले नाही. भरधाव वेग आणि गुळगुळीत टायर यामुळे अपघात झाल्याचे समजते. अपघात आज दुपारी झाला. 

दोडामार्ग : आंबेली येथील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कोल्हापूरहून पणजीकडे जाणारी एसटी बस गटारालगतच्या घळणीला धडकून चिखलात रुतली. बसमध्ये 35 प्रवासी होते; मात्र कुणीही जखमी झाले नाही. भरधाव वेग आणि गुळगुळीत टायर यामुळे अपघात झाल्याचे समजते. अपघात आज दुपारी झाला. 

कोल्हापूरहून तिलारी घाटमार्गे पणजीकडे जाणारी एसटी आंबेली येथील नागमोडी वळणावरील उतारावर आली असता चालकाने समोरून येणाऱ्या एसटीला बाजू देण्यासाठी ब्रेक मारला आणि गाडी डावीकडे वळवली. पण ती न थांबता सरळ डावीकडच्या गटारात गेली. गटारालगत मोठी मातीची घळण आहे. त्याला जाऊन ती डाव्या बाजूने धडकली. अपघातामुळे प्रवाशांनी आरडाओरड केला. प्रत्यक्षात मात्र कुणालाही इजा झाली नाही. गाडीतील प्रवाशांना उजवीकडच्या चालकाच्या दरवाजालगतच्या संकटकाळी बाहेर पडण्यासाठीच्या दरवाजातून बाहेर काढले. त्यानंतर गटारातील गाडी काढण्याचा प्रयत्न चालकाने केला. गाडीचे टायर गुळगुळीत असल्याने ते चिखलात रुतले व पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता नुसतेच फिरू लागले. त्यामुळे चालकाने गाडी तशीच ठेवली. चालक संतोष कांबळे यांनी गाडीचे टायर गुळगुळीत असल्याने ब्रेक मारताच गाडी बाहेर गेल्याचे सांगितले तर प्रवासी आणि स्थानिकांनी गाडीचा वेग खूप होता. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीने रस्ता सोडल्याचे सांगितले. 

झरेबांबर आंबेली परिसरातील उतार व वळणांकडे दुर्लक्ष करून कोल्हापूर, बेळगावहून पणजी, दोडामार्गकडे ये-जा करणाऱ्या गाड्या चालक बेपर्वाईने भरधाव वेगाने चालवतात असा स्थानिकांचा आरोप आहे व त्यात तथ्यही आहे. काही महिन्यांपूर्वी दोन अपघात एसटी बसचे झाले होते. त्यातही चालकाचा निष्काळजीपणा समोर आला होता. त्यामुळे अशा बेफिकीर चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कोल्हापूर, बेळगाव गाड्यांचे चालक-वाहक मधल्या थांब्यावर प्रवासी घेत नाहीत व उतरतही नाहीत. त्याबद्दल तालुकावासियांमध्ये रोष आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी चालक-वाहकांना योग्य सुचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.

Web Title: marathi news marathi website Ratnagiri News Dodamarg Kokan News