पन्हाळागड प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार

File photo of Panhala Fort
File photo of Panhala Fort

पन्हाळा : पन्हाळगड प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त व्हावा, यासाठी 1 जानेवारीपासून येथील प्रवासीकर नाक्‍यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकास कापडी पिशव्या देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पर्यटकांनी या पिशवीत आपल्या जवळील प्लास्टिक बाटल्या, कागद तसेच निर्माण होणारा कचरा ठेवून ही पिशवी परत जाताना ठिकठिकाणी ठेवलेल्या डस्टबीनमध्ये टाकावी अगर नाक्‍यावर द्यावी,अशी विनंती केली जाणार असून नागरिकांना ओला आणि सुका कचरा साठवणयासाठी दोन डस्टबीन देण्यात येणार आहेत. हा सर्व कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करून त्यातून उत्तम प्रतीचे गांडूळ खात बनवून ते शेतकऱ्यांना विकण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न असल्याची माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पन्हाळगडावर नेहमी पर्यटकांची गर्दी असल्याने ठिकठिकाणी प्लास्टिकचा तसेच अन्य कचऱ्याचा ढीग पडतो. हा कचरा येथील काही तरुण मंडळासह नगरपरिषद गोळा करत असले तरी त्यांच्या या प्रयत्नांना मर्यादा पडतात. यावर मात करण्यासाठी प्रवासीकर नाक्‍यावरच पर्यटकांना कचरा साठवण्यासाठी कागदी पिशव्या देण्याचा पालिकेचा प्रयत्न असून येथील बचत गटामार्फत या पिशव्या शिवून घेतल्या जाणार आहेत.नागरिकांना सुरवातीच्या काळात डस्टबीनसह काही कापडी पिशव्या मोफत दिल्या जाणार असून नागरिकांनी नगरपरिषदेकडे साडी दिल्यास त्या साडीपासून पिशव्या तयार करून देणार आहे. यासाठी 2000 डस्टबीन आणि 2000 कापडी पिशव्या तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण 2018 चा राष्ट्रीय स्तरावरील अभियाना अंतर्गत पन्हाळा नगरपरिषदेने स्वच्छतेच्या बाबतीत आघाडी घेतली असून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान आणि केरळ या पश्‍चिम भारतातील 5 राज्यात पन्हाळा पालिकेचा नंबर 287 वर तर पुणे विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात पहिल्या 3 क्रमांकात येण्यासाठी स्वच्छतेबाबत जनजागृती सुरु झाली असून स्वच्छता ऍपवर नागरिकांनी जास्तीत जास्त तक्रारी करून आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सर्वांच्या सहकार्यातून उपक्रम 
नगराध्यक्षा सौ. धडेल, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अतुल पाटील आणि कर्मचारी यांनी जनजागृती फेरी काढून नागरिकांनी कचऱ्याची वर्गवारी करून तो वेगवेगळा देण्याची विनंती केली आहे. येथील दुकानदारानांही प्रशासनाने प्रत्येकी 25 कापडी पिशव्या देण्याची व्यवस्था केली असून नूतन वर्षापासून पन्हाळगड सर्वांच्या सहकार्यातून चकाचक होणार असून पर्यटकांना स्वच्छ वातावरणाचा आणि शुद्ध हवेचा लाभ मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com