संतप्त रेल्वे प्रवासी हातघाईवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

सावंतवाडी : मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जादा गाडी तब्बल 19 तासांहून अधिक काळ उशिरा आल्याने आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या चाकरमानी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की झाली; मात्र पोलिसी खाक्‍या वापरत या प्रकारावर पडदा टाकण्यात आला. हा प्रकार आज सकाळी घडला. 

सावंतवाडी : मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जादा गाडी तब्बल 19 तासांहून अधिक काळ उशिरा आल्याने आज सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या चाकरमानी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की झाली; मात्र पोलिसी खाक्‍या वापरत या प्रकारावर पडदा टाकण्यात आला. हा प्रकार आज सकाळी घडला. 

पावसाळ्यामुळे गाड्या उशिरा धावत आहेत. हा प्रकार आणखी दहा दिवस तरी सुरू राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. आक्रमक भूमिका घेऊ नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या प्रकाराबाबत रेल्वेकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत पोलिस ठाण्यात काहीच दाखल नसल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी : गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून गणपती स्पेशल जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून गाड्यांच्या वेळामध्ये बदल होत आहे. यातच येथील मळगाव रेल्वे स्थानकातून काल (ता. एक) दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी सावंतवाडी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी री शेड्यूल करून ती आज सकाळी नऊ वाजता सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून काल दुपारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे काल परतीच्या प्रवासासाठी आलेल्या चाकरमान्यांमध्ये नाराजी पसरलेली होती.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळेनुसार आज सकाळी चाकरमानी पुन्हा मळगाव रेल्वे स्थानकात आले. सकाळी नऊच्या सुमारास दिवा पॅसेंजर रेल्वे गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होताच नऊ वाजता सुटणारी सावंतवाडी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस ही गाडी एकूण 19 ऐवजी 27 तास उशिरा सुटणार असल्याचे जाहीर करण्यात आले. गाडी सकाळी नऊऐवजी सायंकाळी पाच वाजता सुटणार होती. यामुळे संतप्त झालेल्या सुमारे 200 चाकरमान्यांनी स्टेशन मास्तर संतोष महाजन यांच्या कार्यालयात जात त्यांना धारेवर धरले. गाडी रद्द झाल्याने "काल आम्हाला घरी परतावे लागेल होते. त्यामुळे तुम्ही आता आमच्यासाठी रेल्वे स्थानकात उभी असणारी गाडी सोडा; अन्यथा आमचे तिकिटाचे पैसे आणि येण्या-जाण्याचा खर्च द्या,' अशी मागणी केली. रेल्वे स्थानकात असणाऱ्या गाड्या नियोजित असल्याने त्या वेळेआधी सोडता येणार नाहीत, तसेच तुमचे तिकिटाचे पैसे देतो; मात्र गावापर्यंत येण्या-जाण्याचे पैसे परत करू शकत नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. 

हा वाद वाढतच गेला. काही झाले तरी आम्हाला पैसे परत द्या, असे सांगून चाकरमान्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. रेल्वे प्रशासन आणि मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. हा प्रकार त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनासुध्दा उपस्थित चाकरमान्यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यास सुरवात केली. यावेळी अचानक घडलेल्या प्रसंगामुळे पोलिससुद्धा संतप्त झाले. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी बळाचा वापर सुरू केला. यात दोघा चाकरमान्यांना तर बेदम मारहाण करण्यात आली. 
या प्रकाराला वेगळेच वळण लागत असल्याचे लक्षात येताच काही पोलिसांसह रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत चाकरमान्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर चाकरमान्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. याबाबतची माहिती स्टेशन मास्तर महाजन यांनी दिली. ते म्हणाले, ""आम्ही संबंधित प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करीत होतो; परंतु आपल्याला रेल्वेस्टेशनपर्यंत येण्याचे पैसे द्या, अशी त्यांची मागणी होती. ती पूर्ण करणे आपल्याला शक्‍य नव्हते. त्यामुळेच हा प्रकार घडला. त्यानंतर समजुतीने त्यावर पडदा पडला आहे.'' 

सहकार्याचे आवाहन 
यावेळी रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर म्हणाले, ""मुंबईच्या घटनेमुळे गाड्या उशिरा आहेत. ही परिस्थिती आणखी दहा दिवस सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. लोकांचे आर्थिक, मानसिक नुकसान झाले हे आम्हाला मान्य आहे; मात्र त्यासाठी कोणी कायदा हातात घेऊ नये.'' 

हिंदी भाषेमुळे ठिणगी पडली 
घटनेच्या वेळी रेल्वेस्थानकात कार्यरत असलेल्या रेल्वे पोलिस राम शर्मा यांनी उपस्थित चाकरमान्यांशी हिंदीत संवाद साधला. यावेळी चाकरमान्यांतील काही लोकांनी आपण मराठीत बोला, असे सांगून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. शर्मा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर हा प्रकार घडला. 

संतापाच्या लाटेतून मंत्रीही सुटले नाहीत 
संतप्त जमावाने उशिरा रेल्वे सोडणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घेऊन अपशब्दांची लाखोली वाहण्यास सुरवात केली. त्यामुळे काहीशा प्रमाणात वातावरण अधिक तंग बनले.

Web Title: marathi news marathi websites Kolhapur news sawantwadi railway station