पुनर्वसितांसाठी प्रांताधिकारींनी घेतली बैठक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कऱ्हाड - कण्हेर धरणासाठी 40 वर्षापुर्वी विस्थापित झालेल्या वाघेश्‍वर, चिंचणी, पिंपरी, कवठे, केंजळ गावांतील ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी आज प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्या पुढाकाराने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची जमीन मोजण्यासह अन्य कार्यवाही करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आदेश दिले. मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे आंदोलन पुढे ढकलण्यासाठीच ही बैठक घेतली असून संबंधित बैठकीत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही.

कऱ्हाड - कण्हेर धरणासाठी 40 वर्षापुर्वी विस्थापित झालेल्या वाघेश्‍वर, चिंचणी, पिंपरी, कवठे, केंजळ गावांतील ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी आज प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्या पुढाकाराने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची जमीन मोजण्यासह अन्य कार्यवाही करण्यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आदेश दिले. मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे आंदोलन पुढे ढकलण्यासाठीच ही बैठक घेतली असून संबंधित बैठकीत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागत नसल्याने 26 जानेवारीचे मुंडन आंदोलन करुन सरकारचा दहावा घालण्याच्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी आज दिली.

कण्हेर धरणासाठी पुनर्वसित झालेल्या गावांना 18 नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. चाळीस वर्षांपासून या पुनर्वसित गावचे मुलभूत प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामध्ये जमिनीशेजारी कॅनॉल असून शेतीला पाणी मिळत नाही. गावाची महसूल दरबारी नोंद नाही, मतदार यादीत नावे आहेत. प्लॉटच्या नोंदी नाहीत. प्रकल्पग्रस्त असून मुलांना नोकऱ्या नाहीत, पुनर्वसनात मिळालेली जमीन ही पुन्हा रेल्वेच्या दुपदरीकरणात जाणार आहेत. कारण ती जमीन पूर्वीपासून रेल्वेने संपादीत केलेली होती. अगोदर संपादीत केलेल्या जमीन या लोकांना देऊन शासनाने त्यांची फसवणूक केली आहे. जमिनीची पुर्नमोजणी न झाल्याने हद्दी समजून येत नाहीत आदि समस्या आहेत. त्यासंदर्भात 26 जानेवारीच्या आगोदर निर्णय न झाल्यास सरकार विरोधात 26 जानेवारीलाच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, पदाधिकारी व तेथील ग्रामस्थांनी सरकारला निवेदनाव्दारे दिला होता. त्यासंदर्भातील प्रांताधिकारी श्री. खराडे यांनी तातडीने आज बैठक बोलावली होती. त्यानुसार आज बैठक झाली. तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे, पाटबंधारे विभागाचे अभियंता, भूमी अभिलेखचे अधिकारी, स्वाभिमानी श्री. नलवडे, अनिल घराळ, योगेश झांम्बरे, आनंदी जाधव, प्रकाश गुरव, सिताराम जाधव, प्रशांत जाधव,सीताराम जाधव, भानुदास शिंदे, मधुकर कदम, वाघेश्वर माजी सरपंच आनंदी गाडे, सुधीर वांगडे, दीपक केंजल यांच्यासह वाघेश्वर, पिंपरी, चिंचणी, केंजळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने, भीकाजी संपकाळ, स्वाभिमानीचे सचिन नलवडे, वाघेश्वर सरपंच सुरेश क्षीरसागर, सत्वशीला गाडे, बाबूराव चौधरी यांनी समस्या मांडल्या. त्यावर प्रांताधिकारी श्री. खराडे यांनी पाटबंधारेचे मुख्य अभियंता यांना 30 जानेवारी पर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडे गावठान जमीन मोजणीची रक्कम भरण्याचे आदेश दिले. तर भूमी अभिलेख अधिकारी यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत जमिनीची मोजणी पुर्ण करुन खातेदाराला सातबारा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शेतीला पाणी देण्यासाठी पाइपलाइन व पोटपाट करण्यासाठीचा प्रस्ताव 15 फेब्रुवारी पर्यंत देण्याचा आदेश दिले. बैठकीनंतर प्रकल्पग्रस्त व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी 38 वर्षापासून अनेक बैठका होऊनही बैठकीतील आदेश अधिकारी पाळत नाहीत, फक्त वेळ काढूपणाचे धोरण स्विकारतात आणि प्रश्न जैसे थे राहतात. त्यामुळे 25 जानेवारी पर्यंत आमचा एकतरी प्रश्न सुटणे अपेक्षित आहे. मात्र तसे होणार नसल्याने आम्ही 26 जानेवारीच्या आंदोलनावर ठाम असल्याचे श्री. नलवडे यांनी सांगितले.

Web Title: marathi news meeting for rehabilitated