महिला सरपंचाच्या नेतृत्वाखाली दारू अड्डे उध्वस्त !

हरिभाऊ दिघे
रविवार, 21 जानेवारी 2018

पोलिसांकडून दुर्लक्ष 
पिंपरणे गावात मागील महिन्यात दारु व गुटखा बंदीचा ठराव घेतला होता. त्यानंतर काही दिवस दारु व गुटखा विक्री बंद होती. मात्र पुन्हा छुप्या पद्धतीने हे व्यवसाय सुरु झाले. याबाबत पोलिसांना निवेदनही देण्यात आले. मात्र कोणतीही कारवाई केली नसल्याने आम्ही दारु अड्डे उद्धवस्त केले.
- इंद्रायणी वाकचौरे, सरपंच - ग्रामपंचायत, पिंपरणे

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे ग्रामपंचायतीने दारुबंदीचा ठराव मंजूर केला असताना देखील गावात छुप्या पद्धतीने दारु विक्री सुरु होती. त्यामुळे संतप्त झालेल्या गावच्या महिला सरपंच इंद्रायणी वाकचौरे व ग्रामपंचायत सदस्यांसह तरुणांनी तीन ठिकाणी सुरु असलेले दारु अड्डे उद्धवस्त केले. दारुच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या. शनिवारी ( ता. २० ) सकाळी अकराच्या सुमारास ही मोहीम राबविण्यात आली.

पिंपरणे गावात झालेल्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव घेण्यात आला होता. जो कोणी अवैधरित्या दारुची विक्री करेल, त्याला दंड केला जाईल असे ग्रामसभेत बजावण्यात आले होते. काही दिवस दारु विक्री बंद होती. त्यानंतर छुप्या पद्धतीने दारु विक्री सुरु झाली. याबाबत वेळोवेळी तालुका पोलिसांना सांगण्यातही आले होते. मात्र त्यांनीही याप्रकाराकडे दुर्लक्ष केले. शेवटी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास गावच्या सरपंच इंद्रायणी वाकचौरे, उपसरपंच अजित देशमुख, ग्रामपंचायत सदस्य शोभा ठोंबरे, शैला साळवे, सुवर्णा काळे, अर्चना खंडागळे, संजय बागुल, दादाभाऊ गायकवाड, उत्तम भालेराव, मंजाबापू साळवे, भागवत ठोंबरे, संतोष वाकचौरे, उत्तम राहिंज, गोकुळ काळे, राहुल बागुल, संजय वाकचौरे, रवि रोहम, राजू साळवे, कल्याण जोर्वेकर हे एकत्र आले. त्यानंतर तीन ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या दारु अड्डयांवर मोर्चा नेला. काही विक्रेत्यांनी देशी दारुच्या बाटल्या गाजराच्या शेतामध्ये लपवून ठेवल्या होत्या.

त्यामुळे सरपंच व महिला चांगल्याच संतप्त झाल्या. त्यांनी या दारुच्या बाटल्या रस्त्यावर फोडून टाकल्या. पोलिसांना सांगूनही त्यांनी याबाबत लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन हाती घ्यावे लागले, असेही सांगत संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. या मोहिमेमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांकडून दुर्लक्ष 
पिंपरणे गावात मागील महिन्यात दारु व गुटखा बंदीचा ठराव घेतला होता. त्यानंतर काही दिवस दारु व गुटखा विक्री बंद होती. मात्र पुन्हा छुप्या पद्धतीने हे व्यवसाय सुरु झाले. याबाबत पोलिसांना निवेदनही देण्यात आले. मात्र कोणतीही कारवाई केली नसल्याने आम्ही दारु अड्डे उद्धवस्त केले.
- इंद्रायणी वाकचौरे, सरपंच - ग्रामपंचायत, पिंपरणे

Web Title: Marathi news Nagar news