पोलिसांच्या ताब्यातून संशयिताचे पलायन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

कोरेगाव - रुई (ता. कोरेगाव) येथे एकावर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील एका संशयिताने आज पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. 

कोरेगाव - रुई (ता. कोरेगाव) येथे एकावर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील एका संशयिताने आज पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी एकनाथ चव्हाण (वय 36, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव) असे पलायन केलेल्या संशयिताचे नाव आहे. शिव्या का देता, असे विचारल्याच्या कारणावरून रुई येथील नितीन चंद्रकांत बुधावले यास बोरजाईवाडी येथील दोघांनी दांडके व तलवारीने मारहाण केली होती. शनिवारी (ता. तीन) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मारहाण झाल्याची फिर्याद रितेश सुभाष बुधावले (रा. रुई, ता. कोरेगाव) यांनी दिली. याप्रकरणी बोरजाईवाडीतील दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी धनाजी चव्हाण याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला आज न्यायालयापुढे नेण्यात येणार होते. तत्पूर्वी आज दुपारी सव्वाच्या सुमारास त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात होते. त्या वेळी त्याच्या हातात बेड्या नव्हत्या. पोलिस नाईक महादेव दत्तात्रय आळंदे हे त्यांच्या दुचाकीवरून संशयित धनाजी चव्हाण याला येथील शासकीय रुग्णालयाकडे घेऊन निघाले होते. शांतीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ धनाजीने दुचाकीवरून उडी मारली आणि शेजारच्या शेतातून पलायन केले. यासंदर्भात पोलिस नाईक आळंदे यांनी फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक मिसळे तपास करत आहेत. दरम्यान, तलवार हल्ला प्रकरणातील दुसरा संशयित पप्पू ऊर्फ नंदकुमार संतोष शिरतोडे (रा. बोरजाईवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. पलायन केलेल्या धनाजी चव्हाण याची पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आहे.

Web Title: marathi news police crime koregaon

टॅग्स