तडीपार गुंड राजू नलावडेचा साताऱ्यात आकस्मिक मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

सातारा - येथील मंगळवार पेठेतील राजू रामदास नलावडे ऊर्फ शेंबडा राजा याचा आज दुपारी मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची माहिती समजू शकली नाही. 

सातारा - येथील मंगळवार पेठेतील राजू रामदास नलावडे ऊर्फ शेंबडा राजा याचा आज दुपारी मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची माहिती समजू शकली नाही. 

शाहूपुरी व सातारा शहर पोलिस ठाण्यात राजू नलावडे याच्यावर मारामारी, शस्त्रे बाळगणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तो "पॅरोल'वर बाहेर आला होता. त्यानंतरही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे त्याला तडीपार करण्यात आले होते. नुकताच काही काळापूर्वी त्याने गुन्हेगारीचा मार्ग सोडून देत घंटागाडीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह सुरू केला होता. घंटागाड्यांच्या अनुषंगाने नगरपालिकेने खासगी कंपनीशी करार केल्यानंतर नलावडेने पालिकेत उपोषणालाही बसला होता. त्या वेळी त्याने "मला शांततेच्या मार्गाने जगू द्या', गुन्हेगारी मार्गाकडे वळण्यास भाग पाडू नका,' असा फलकही लावला होता. 

आज दुपारी कुटुंबीयांनी बेशुद्धावस्थेत त्याला रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तेथे गेले. मात्र, कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांना सांगितले. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. 

Web Title: marathi news satara criminal death