महिला सामर्थ्यवान, तर देश सामर्थ्यवान - अभिनेता अक्षयकुमार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

‘भारत के वीर’ने दिली ५० कोटींची मदत
माझे वडील शेतकरी, सैनिक होते. त्यामुळे मला सैन्याविषयी प्रचंड आदर आहे. मी भारत सरकारला हुतात्मांना मदत देण्यासंदर्भात ‘भारत के वीर’ 
हे ॲप बनविले. आजपर्यंत त्यातून ५० कोटी रुपयांची मदत हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळाली आहे, असेही अक्षयकुमारने सांगितले.

सातारा - महिला या स्वतःच्याच दुश्‍मन आहेत. मेडिकलमध्ये गेल्या तरी सॅनिटरी पॅड लपूनछपून मागतात. पाळी ही भगवंताने दिलेली देणं आहे. सर्वांचा जन्म त्यातूनच होतो. महिलांची काळजी घेणे हे खरे तर पुरुषांचे कर्तव्य आहे. महिला सामर्थ्यवान झाल्या तरच देश सामर्थ्यवान बनेल, असे मत अभिनेता अक्षयकुमार याने व्यक्त केले. 

पोलिस विभागाच्या युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीनिमित्त अक्षयकुमार येथे आला होता. जिल्हा परिषदेच्या येथील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात ही स्पर्धा होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक विजय पवार आदी उपस्थित होते. सर्वात पहिले मला विश्‍वास पाटील यांना थॅंक्‍यू म्हणायचे आहे, मला मराठी चांगले येते ना? अशी सुरवात करत अक्षयकुमारने धमाल उडवून दिली. तो म्हणाला, ‘‘मुंबई पोलिसांमुळे मी मराठी बोलायला शिकलो.

मोटर चालवत असताना मुंबई पोलिसांनी मला अडविले आणि लायसन्स विचारले. मी इंग्रजीत बोलू लागलो तेव्हा त्या पोलिसांनी मला मराठी शिका, असा सल्ला दिलेला होता. भारतातील ८२ टक्‍के महिला सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. परिणामी, भविष्यात २० टक्‍के महिला कर्करागाला बळी पडतात. महिलांनी मासिक पाळीची काळजी घेतली पाहिजे. ८२ टक्‍क्‍यांचे प्रमाण ७२ टक्‍केवर आले तरी ते माझ्या चित्रपटाचे यश मानेन. ‘पॅडमॅन’ हा केवळ चित्रपट नाही तर ती चळवळ आहे. भारत सरकारबरोबर वर्ल्ड बॅंकेने करार केला असून, लवकरच सहा लाख ७८० गावांमध्ये हा चित्रपट मोफत दाखविला जाणार आहे. यापुढे महिलांच्या समस्यांवर जास्त चित्रपट बनविणार आहोत, असेही अक्षयकुमारने सांगितले.  

‘आयजी’ केवल लोटेकर
केवल लोटेकर या युवकाने बेधडकपणे विश्‍वास नांगरे- पाटील, विराट कोहली, अक्षयकुमार, आई- वडील, आर्मीतील मित्र हे आदर्श असल्याचे सांगत नांगरे- पाटील यांची भाषणे मी सातत्याने ऐकत असतो.

भविष्यात मलाही त्यांच्यासारखे बनायचे आहे. मी व्यासपीठावर येऊ का? अशी इच्छा व्यक्‍त केली. त्यावर अक्षयकुमारने त्याला बोलावले, तर नांगरे- पाटील यांनी स्वत:ची ‘पी कॅप’ केवलच्या डोक्‍यावर चढविली. 

चिखो, चिलाओ
प्रिया कुलकर्णी या लहान मुलीने अनेक प्रश्‍न विचारल्याने अक्षयकुमारने तिला व्यासपीठावर बोलावले आणि बस स्थानकावर रात्री तुझ्याबरोबर छेड काढली तर तू काय करशील, असा प्रश्‍न केला. तो प्रसंग कसा असेल असे सांगत त्याने प्रात्यक्षिक दाखविले. त्या वेळी असे जर गैरवर्तन कोणी केल्यास त्याच क्षणी जोरात ओरडा, काय सापडेल त्याने प्रतिकार करा, असा सल्ला देत ‘चिखो, चिलाओ’चा मंत्र अक्षयकुमारने दिला.

हा दिला मंत्र
मी उगवता सूर्य प्रत्येक दिवशी पाहिला
पहाटे उठणाऱ्यांचे आरोग्य सदृढ राहते
जीवन हे शिस्तप्रिय असले पाहिजे
आई-वडिलांची काळजी घ्या, देव तुमची काळजी घेईल

Web Title: marathi news satara news actor akshaykumar youth parliament championship event