कोयना धरणात ८० टीएमसी पाणी साठले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

जून महिन्याच्या अखेरीस व १२ जुलैपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा ८० टीएमसीपर्यंत पोहचला आहे. कोयना जलाशयाच्या जलाशय परिचालनानुसार जलाशयाची निर्धारीत जलपातळी राखण्यासाठी शनिवारपासून पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे.

कर्‍हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ जुलैपासून सलगतेने पडलेल्या पावसामुळे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ७९.६३ टीएमसी झाला आहे. सध्या सुरु असलेले पर्जन्यमान कायम राहिलेस जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग शनिवार ता. २९ जुलैपासुन करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.

त्यामुळे कोयना काठच्या जनतेला सावधानतेचा इशारा तहसिलदार रामहरी भोसले यांनी दिला आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर १ ऑगस्टपासून सहा वक्र दरवाज्यांतून पाणी सोडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

जून महिन्याच्या अखेरीस व १२ जुलैपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा ८० टीएमसीपर्यंत पोहचला आहे. कोयना जलाशयाच्या जलाशय परिचालनानुसार जलाशयाची निर्धारीत जलपातळी राखण्यासाठी शनिवारपासून पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्र्वर बागडे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना कळविले आहे.

पावसाचे प्रमाण वाढले अथवा आहे असे राहिले तरी १ ऑगस्टपासून सहा वक्र दरवाज्यांच्या सांडव्यावरुनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता प्रसासनाने वर्तवली आहे. पावसामुळे सध्या कोयना नदी दुधडी भरुन वहात आहे. साठा नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने कोयनानदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे धरणाच्या खालील भागातील नदीकाठच्या गावांनी व वाड्यावस्त्यांतील नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये. त्याच बरोबर विद्युत मोटारी, इंजिन, शेती अवजारे व पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

गेल्या २४ तासात सर्वात जास्त कोयनानगरला  १७ (३०२५) मिलीमीटर, नवजाला ३३ (३३४०) मिलीमीटर व महाबळेश्र्वरला २४ (२८७१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची एकूण पाणीपातळी २१४०.९ फुट झाली असून पाणीसाठ्यात १.१९ टीएमसीने वाढ होऊन एकूण पाणीसाठा ७९.६३ टीएमसी झाला आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद १७ हजार १६६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

Web Title: marathi news satara news Koyana Dam Monsoon Rain in Satara