बिबट्याच्या हल्ल्यामधील जखमींची उपचारांत फरफट 

बिबट्याच्या हल्ल्यामधील जखमींची उपचारांत फरफट 

सातारा - बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांची इंजेक्‍शनसाठी फरफट झाली. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घातल्यानंतर रात्री उशिरा रुग्णांवर उपचार सुरू झाले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील जखमींच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. 

शाहूपुरी परिसरात परवा सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी झाला. डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत आल्याची शक्‍यता आहे. बिबट्या आल्यानंतर परिसरातील कुत्री भूंक लागली होती. त्यामुळे परिसरातील काही युवक ओढ्यात बिबट्याचा माग काढत होते. या वेळी एका युवकावर बिबट्याने हल्ला केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. युवकावर हल्ला झाल्याची माहिती समजल्यावर परिसरात बघ्यांची गर्दी वाढली. त्यामुळे बिबट्या खवळला. त्यातून त्याने रात्री उशिरा दोघांवर हल्ला केला. या जखमींना गुरुवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दोघांवर उपचार सुरू झाल्यानंतर त्यांना रेबिजची लस देण्यापूर्वी चाचणी करण्यात आली. या वेळी एका रुग्णाला रिऍक्‍शन आली. त्यामुळे त्याला इंजेक्‍शन देण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासून नातेवाईक डॉक्‍टर काय सांगतात, याची वाट पाहात होते. इंजेक्‍शन न दिल्यामुळे त्रास वाढणार तर नाही ना, असा प्रश्‍न त्यांच्या मनात होता. मात्र, सायंकाळपर्यंत संबंधित डॉक्‍टर भेटले नाहीत, असा नातेवाईकांचा आरोप आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास डॉक्‍टर भेटले. त्या वेळी त्यांना तातडीने दुसरे इंजेक्‍शन द्यावे लागले, त्याची किंमत आठ हजार रुपये आहे, रुग्णालयात ते उपलब्ध नाही. बाहेरून आणावे लागेल, एकूण तीन इंजेक्‍शन्स द्यावी लागतील, असे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यामुळे संबंधित रुग्णांबरोबर असलेल्या पत्नीची गडबड उडाली. एवढे पैसे कोठून आणायचे, असा प्रश्‍न त्यांना पडला. तसेच त्यांच्यासोबत कोणी इतर नातेवाईकही नव्हते. त्यामुळे काय करायचे, असा प्रश्‍न त्यांना पडला. इंजेक्‍शन आणत नसाल तर, रुग्ण ससूनला घेऊन जा, असा सल्लाही डॉक्‍टरांनी दिला. त्यामुळे रुग्णाची पत्नी घाबरली. 

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे जिल्ह्यातील प्रमाण पाहता अशा प्रकारची इंजेक्‍शन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणे आवश्‍यक असल्याची गोष्ट मात्र, या निमित्ताने अधोरेखित झाली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत तातडीने उपाययोजना करून तशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणे आवश्‍यक आहे. तरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फरफट थांबेल. 

"सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे मोफत इंजक्‍शन  
दरम्यान, याबाबतची माहिती रुग्णाच्या पत्नीने शाहूपुरीचे माजी सरपंच भारत भोसले यांना सांगितली. त्यांनी ही गोष्ट "सकाळ'ला सांगितली. "सकाळ'ने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांना ही माहिती दिली. त्यांनी रुग्णाला संबंधित इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीही जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून रुग्णाला आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. मात्र, तोपर्यंत इंजेक्‍शन मिळत नाही म्हटल्यावर पत्नीने रुग्णाला खासगी रुग्णालयात नेले होते. "सकाळ'ने जिल्हा रुग्णालयातच उपचार होतील, अशी माहिती दिल्यानंतर रुग्णाला पुन्हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर रात्री उशिरा त्याला संबंधित इंजेक्‍शन देऊन उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाची प्रक्रृती सध्या व्यवस्थित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com