पंधरा दिवसांनंतरही प्राधिकरणाला सापडेना चोकअप!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

सातारा - अंतर केवळ शे-दीडशे मीटरचे, पण गेले १५ दिवस ‘प्राधिकरणा’ला जलवाहिनीवरील चोकअप मात्र सापडत नाही. १५ दिवस लोकांना अंघोळीचं सोडाच; प्यायला पाणी नाही. कर्मचारी रोज जातात अन्‌ जागा बदलून खड्डा खोदत बसतात. ‘उद्या सकाळपर्यंत येणार’ असे रोजचे आश्‍वासन. परंतु, ‘प्राधिकरणा’चा हा ‘उद्या’ काही उजाडायचे नाव घेत नाही. १५ दिवसांत चोकअप सापडत नाही, हे अभियांत्रिकीचे अपयश म्हणावे की त्याचे शिक्षण घेतलेल्या माणसांचे, असा सवाल उभा राहिला आहे.

सातारा - अंतर केवळ शे-दीडशे मीटरचे, पण गेले १५ दिवस ‘प्राधिकरणा’ला जलवाहिनीवरील चोकअप मात्र सापडत नाही. १५ दिवस लोकांना अंघोळीचं सोडाच; प्यायला पाणी नाही. कर्मचारी रोज जातात अन्‌ जागा बदलून खड्डा खोदत बसतात. ‘उद्या सकाळपर्यंत येणार’ असे रोजचे आश्‍वासन. परंतु, ‘प्राधिकरणा’चा हा ‘उद्या’ काही उजाडायचे नाव घेत नाही. १५ दिवसांत चोकअप सापडत नाही, हे अभियांत्रिकीचे अपयश म्हणावे की त्याचे शिक्षण घेतलेल्या माणसांचे, असा सवाल उभा राहिला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एकूणच कारभाराचे विविध किस्से रोज ऐकायला मिळतात. शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीत अंदाजे दीडशे मीटर अंतरातील पाण्याची जलवाहिनी रस्त्याच्या मधून जाते. त्याच्या दुतर्फा कनेक्‍शन्स आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून या भागातील नागरिकांच्या पाण्याबाबत तक्रारी होत्या. मुळातच शाहूपुरीत आधी पाण्याची ओरड असते. या भागातील नळांना पुरेसे पाणी मिळेल तो सुदिन मानला जातो. तक्रारीची दखल घेऊन अधिकारी लोक घटनास्थळावर पोचले अन्‌ कामाला सुरवातही झाली. ‘आज काम हातात घेतले आहे, 

सायंकाळपर्यंत पाणी मिळेल,’ असा अधिकाऱ्यांचा सुरवातीचा सूर होता. एकाचे दोन, दोनाचे चार अन्‌ चारचे आठ म्हणत १५ दिवस लोटले तरी अधिकाऱ्यांना जलवाहिनीतील चोकअप काही मिळेना. या जलवाहिनीवर रोज एक खड्डा घेतला जात होता. खड्डा नवीन परंतु प्रश्‍न कायम होता, लोकांना पाणी का मिळत नाही. अद्यापही शाखा अभियंत्याला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जलवाहिनी कुठे चोकअप झाली आहे, ते ठिकाण सापडत नाही. ठेकेदाराच्या माणसांनीही डोकं लावून पाहिलं. परंतु, कोणालाच दाद लागेना, अशी परिस्थिती आहे. 

या संदर्भात शाहूपुरी ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा, पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणामुळे शाहूपुरीतील यंत्रणा विस्कळित झाली आहे. कर्मचारी वाढवण्याची मागणी करूनही लोक वाढवले गेले नाहीत. एका कामावरून माणूस कमी करून दुसरीकडे टाकणे, पुन्हा तेथे ओरड झाली की इथून उचलून त्याला तिथं पाठविणे, एवढाच खेळ खेळला जातो. परिणामी अपुऱ्या स्टाफमुळे नागरिकांना गैरसोयींना तोड द्यावे लागते. यावर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेच नियंत्रण नाही.’’

शाहूपुरीचे माजी उपसरपंच भारत भोसले म्हणाले, ‘‘जलवाहिन्यांची गळती काढण्याच्या कामावेळी हलगर्जीपणामुळे मुख्य जलवाहिनीत मुरूम, माती वाहून जाते. नंतर मग पुढे पाण्याच्या रेट्याने लोकांच्या छोट्या लाइन चोकअप होतात. महिनोंमहिने कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणी येते. अधिकाऱ्यांना तांत्रिक जाणीव नाही. कोणत्याही एजन्सीवर काम सोपवतात. त्याचे चटके नागरिकांना सोसावे लागतात, त्याचे अधिकाऱ्यांना भान नाही.’’

शाहूपुरीत काविळीची साथ पसरली होती. ६० ते ६५ रुग्ण होते. एकही अधिकारी पाहणी करायला शाहूपुरीत आला नाही. इतके निर्ढावलेपण अधिकाऱ्यांमध्ये असेल तर ते जनतेच्या सर्वसामान्य अडचणींमध्ये कसा न्याय देणार, असा संतप्त सवाल शाहूपुरीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र केंडे यांनी यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला. 

शाहूपुरीचे माजी उपसरपंच अमित कुलकर्णी म्हणाले, ‘‘रांगोळे कॉलनीत १५ दिवस झाले पाणी नाही, चोकअप काढण्यासाठी दहा ठिकाणी रस्ता खोदण्यात आला. प्राधिकरणाचे हे प्रयत्न पुरेसे नाहीत. आत्मियतेने काम करत नाहीत. अधिक लोक कामाला लावून एक ते दोन दिवसांत पाणीपुरवठ्यातील अडथळा दूर झाला पाहिजे. तर त्याला युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणता येईल. दोन कर्मचाऱ्यांनी १५-१५ दिवस खड्डे खोदून तुम्ही बसता त्याला युद्धपातळीवर प्रयत्न म्हणणे हास्यास्पद होईल.’’
 

...याला जबाबदार कोण? 
प्राधिकरणाचे अधिकारी युद्धपातळीवर काम सुरू आहे, असे म्हणतात. एक जेसीबी, चार कर्मचारी घेऊन गेले दोन आठवडे त्यांचे येथे खोद, तिथे खोद सुरू आहे. कदाचित ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतही असतील. परंतु, अंतिम फलित काय तर इतके दिवस काम करूनही शाहूपुरीत प्यायला पाणी नाही. 
एक चोकअप काढण्यासाठी आणखी किती रुपये ठेकेदाराच्या नरड्यात घालणार? आणि एवढं करूनही पाणी नाहीच याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न शाहूपुरीतील नागरिक विचारत आहेत.

Web Title: marathi news satara news water supply leakage