निलंबन अन्‌ दंडाची 'शाळा' अखेर अंगाशी 

सिद्धार्थ लाटकर  
मंगळवार, 6 मार्च 2018

एका शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याचे 10 दिवस निलंबन व 200 रुपयांच्या दंडाच्या कार्यवाहीचा फतवा पालकांसाठी काढला. 'सकाळ'च्या प्रतिनिधीने सोशल मीडियाद्वारे हा प्रकार चव्हाट्यावर आणल्याने शिक्षण विभागाने त्याची तत्काळ दखल घेत कार्यवाही केली. 

सातारा - जिल्ह्यात उद्या (ता. सहा) होणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्‍यता गृहित धरून एका शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याचे 10 दिवस निलंबन व 200 रुपयांच्या दंडाच्या कार्यवाहीचा फतवा पालकांसाठी काढला. याबाबत 'सकाळ'च्या प्रतिनिधीने सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री, नागरिकांपर्यंत ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर जागरूक नागरिकांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून कारवाईचा आग्रह धरला. अखेर 'सकाळ'ने हा प्रकार चव्हाट्यावर आणल्याने शिक्षण विभागाने त्याची तत्काळ दखल घेत कार्यवाही केली. 

खासगी शाळांकडून पालकांची, विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या प्रकारे पिळवणूक होते याबाबत अनेकदा "सकाळ' वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध करीत आले आहे. काही शाळा प्रवेश देताना मामा, काकाच्या नावावर देणगीच्या पावत्या देतात. काही शाळा वह्या, दप्तर यासह शालेय साहित्याची खरेदी शाळांतूनच करावी असा आग्रह धरतात, तर काही चक्क व्यावसायिकांना हाताशी धरून गणवेशापासून ते बुटापर्यंतच्या वस्तू अमूक-तमूक दुकानातूच घ्या, असे फर्मान काढतात. यामुळे पालकांना बाजारभावापेक्षा अधिक पैसे मोजावे लागल्याचे प्रकारही घडत असतात.

खासगी शाळा व महाविद्यालये पालकांकडून आर्थिक दंड वसूल करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. येथील एका शाळेने तर आज कहरच केला. उद्या (मंगळवार) रंगपंचमी असल्याने विद्यार्थी अनुपस्थित राहतील, या शक्‍यतेने अजब फतवा काढला. विद्यार्थी उपस्थित राहिला नाहीतर त्याचे चक्‍क दहा दिवस शाळेतून निलंबन केले जाईल आणि दोनशे रुपये आर्थिक दंड केला जाईल, असा संदेश संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविला. 

हा संदेश "सकाळ'ला मिळाल्यानंतर तो सोशल मीडियाच्या व्यासपीठावर मांडण्यात आला. त्यावर शालेय समितीची रचना, शाळा प्रवेशावेळीस घेतल्या जाणाऱ्या देणग्या, शाळांकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी होणारा आर्थिक दंड या विषयी जागरूक नागरिकांनी आपली मते व्यक्त केली. काहींनी तर थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत शाळांच्या तक्रारींचा पाढाच वाचला. 

असा होता संदेश
संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना नित्यनेमाने सूचनांचे संदेश पाठविले जातात. आजही अशाच प्रकारचा एक संदेश पाठविण्यात आला. हा संदेश "सकाळ'ला मिळाला. तो पुढीलप्रमाणे... 
Dear Parents, Students those who are going to be absent tomorrow will be suspended from school for 10 days and have to pay rs.200 fine. 

अशी फिरली चक्रे... 
जागरूक नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शाळेच्या संदेशाबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी उपशिक्षणाधिकारी एच. व्ही. जाधव यांना संबंधित शाळेत पाठवून शहनिशा केली. त्यावर संबंधित प्राचार्यांनी चूक मान्य करीत शिक्षण विभागाची माफी मागितली, तसेच पूर्वीच्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे, असा संदेश नव्याने पाठविला. हा प्रकार आरटीईच्या नियमात बसत नसल्याने संबंधित शाळेस नोटीस पाठविणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.

Web Title: marathi news satara school complaint education department