साताऱ्यात आज होणार स्त्रीशक्तीचा गौरव!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

कधी काळी चूल आणि मूल यातच गुंतून पडलेल्या महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. या महिला व युवती विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सकाळ मधुरांगण’च्या वतीने उद्या (ता. ७) या स्त्रीशक्तीचा गौरव केला जाईल. साताऱ्यातील शाहू कलामंदिरात दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जाणार आहे. याच वेळी हास्यसम्राट अशोक नायगावकर यांचा ‘मिश्‍किली आणि कविता’ हा कार्यक्रम होणार आहे. सत्कारमूर्तींचा परिचय...

फास्टेस्ट रायडर गर्ल - तनिका शानभाग
पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या मोटोक्रॉससारख्या साहसी क्रीडा प्रकारात साताऱ्यातील शाळकरी मुलगी तनिका शानभाग स्वतःला अजमावू पाहात आहे. ती राष्ट्रीय बास्केटबॉलपटूही आहे. मोटोक्रॉस खेळाचा हा वारसा तिला घरातूनच मिळाला. वडील संकेत व आजोबा रमेश शानभाग हे मोटोक्रॉसमध्ये भाग घेत. लहान भाऊ वयाच्या पाचव्या वर्षांपासून दुचाकी चालवित आहे. तनिकालाही लहानपणापासून दुचाकीची आवड. ही आवडही केवळ गाडी चालविण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर स्पर्धांत भाग घेण्याची तिलाही हौस लागली. मोटोक्रॉसच्या सरावासाठी घरच्या शेतात ट्रॅक तयार केला. डोंगराळ भागातही तिने कसून सराव करून मोटोक्रॉसमध्ये सहभागी होण्याची तयारी केली. गुरगाव येथे झालेल्या मोटोक्रॉस स्पर्धेत ती प्रथम सहभागी झाली. १५ वर्षांखालील गटात पहिल्याच प्रयत्नात तिने यश मिळविले. मलेशियातील स्पर्धेतही ती सहभागी झाली होती. पुणे इन्व्हिट्‌शनल सुपर क्रॉस लिगमध्ये एसएक्‍स ज्युनियर गटात तिने ११४ गुण मिळविले. देश व परदेशातील स्पर्धांत सहभागी होणारी ती साताऱ्यातील पहिली मुलगी ठरली. तनिका ही साताऱ्याची महिला रायडर म्हणून ओळखली जाते. या खेळात मला ‘फास्टेस्ट गर्ल’ किंवा ‘ओन्ली गर्ल’ व्हायचे नाही, तर फक्त ‘फास्टेस्ट रायडर’ म्हणून माझी ओळख झाली पाहिजे, अशी तनिकाची इच्छा आहे.

महिलांच्या उन्नतीचा ध्यास  - विद्या सुर्वे
डों गराळ ग्रामीण भागातील महिलांची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी केळघर येथील विद्या सुर्वे या गेली १८ वर्षे काम करताहेत. जावळी तालुका तसा अतिशय दुर्गम. डोंगर उताराच्या शेतीत राबणाऱ्या महिलांच्या कष्टाला पारावार नाही. दिवसभर शेतात राबून त्यांना पुरेसे उत्पन्नही मिळत नाही. या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी श्रमिक जनता विकास संस्थेने १९९९ मध्ये श्रमिक महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. ही संस्था सर्व महिलाच चालवितात. केळघर परिसरातील पतसंस्थेच्या व्यवस्थापिका विद्या सुर्वे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांचे चांगले संघटन केले. महिलांना पतसंस्थेचे सभासद करून घेतले आणि त्यांना बचतीची सवय लावली. या महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना छोटे-मोठे उद्योग, शेती सुधारणा, गोपालन करण्यास प्रवृत्त केले. सुर्वे यांच्या प्रयत्नातून ६५ गावांतील चार हजार महिला पतसंस्थेच्या सभासद आहेत. २४५ बचत गट संस्थेला जोडलेत. महिला उद्योगासाठी कर्ज घेतात आणि वेळेत फेडतातही. सुर्वे या इतर सामाजिक कार्यातही आघाडीवर असतात. परिसरातील गावात त्यांनी एड्‌स जनजागृती अभियान राबविले. महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देतात. गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठीही त्या सतत प्रयत्नशील असतात. 

उपक्रमशील शिक्षिका - धनवंती कांबळे-लोकरे
निकमवाडी (ता. वाई) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका धनवंती विष्णू कांबळे यांनी विद्यार्थी व शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ज्ञानरचनावादी शिक्षण, परसबाग, औषधी  वनस्पती उपक्रम, गांडूळ खत, गप्पी मासे पैदास केंद्र, इंग्रजीच्या बोलक्‍या भिंती, पहिलीपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कलादालन इत्यादी उपक्रम त्यांनी शाळेत राबवलेत. या उपक्रमांतर्गत शाळेत सर्वांगीण गुणवत्ता कार्यक्रमात वाई तालुक्‍यात पाच वेळा प्रथम क्रमांक आला आहे. याच कार्यक्रमात २००७ मध्ये जिल्ह्यात तिसरा, २००९ मध्ये पहिला, तर २०१२ ते १६ पर्यंत सलग चार वेळा  प्रथम क्रमांक आला आहे. सातारा जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरा असणारी पहिली शाळा त्यांनी तयार केली. २०१४ मध्ये जिल्ह्यातील पहिली बायोमॅट्रिक हजेरी शाळेत सुरू केली. राज्यातील ३० हजार १५६ शिक्षिकांना ज्ञानरचनावादावर आधारित मार्गदर्शन केले आहे. नवोदय, शिष्वृत्ती परीक्षा, ज्ञानप्रबोदिनी परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन परीक्षेमध्ये २६८ विद्यार्थी जिल्ह्याच्या, राज्याच्या यादीत  आणण्यात त्यांचा वाटा आहे. त्यामुळे शाळेची पटसंख्या ३७ वरून १५२ वर गेली आहे. या वर्षी इंग्रजी माध्यामाच्या ५५ मुलांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळासिद्धी उपक्रमात शाळेला ‘अ’ श्रेणीसह आयएसओ मानंकन प्राप्त झाले आहे. शेजारच्या गावातून मुले शाळेत येतात. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी भेटी देतात.

जिद्दी स्कूल बसचालक - सुजाता सोनटक्के
घरची बेताची परिस्थिती. पती रंगकामासाठी मुंबईत असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. केवळ जिद्द आणि शिकण्याची इच्छेतून त्या गाव सोडून शहरात आल्या आणि इस्त्रीचा व्यवसायासोबतच स्कूल बस चालविण्याचे धाडस दाखविले. बघता बघता ही स्कूल बसच त्यांच्या कुटुंबाचा आधार ठरली. 

दौलतनगर येथील सुजाता सोनटक्के या दिवसातील १२ तास स्वत:ची स्कूल बस चालवून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकत आहेत. या उत्पन्नाच्या जिवावर त्यांनी आपल्या कुटुंबाची घडी बसविली. मुलांना उच्चशिक्षितही केले. गृहिणी ते स्कूल बसचालक असा त्यांचा संघर्षमय प्रवास आहे. पती मुंबईला रंगाच्या कामात होते. त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. दोन मुले झाल्यावर त्यांना शाळा व कुटुंबाचा खर्च चालविणे जिकिरीचे झाले. ग्रामीण भागात राहून मुलांना चांगले शिक्षण देता येत नसल्याने त्या साताऱ्यात आल्या. पतीच्या उत्पन्न कमी होते. त्यामुळे इस्त्रीचे दुकान टाकले. त्यावरही आर्थिक गणित जमेना. एका शाळेच्या स्कूल बसला अटेंन्डन्स म्हणून त्या काम करू लागल्या. पुढे त्या स्कूल बस चालविण्यास शिकल्या. स्कूल बस खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. दौलतनगरातील लोकांनी, तसेच तनिष्का सदस्य, नातेवाईकांनी मदत केली.  त्यातून त्यांनी स्कूल बस घेतली. आता त्या विविध शाळांत मुले पोचवितात. त्यांनी मुलीला एमबीए केले अन्‌ मुलगा बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात आहे.

लॉन टेनिसमधील ‘दादा’ - आर्याली चव्हाण 
कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांची परंपरा असलेल्या जिल्ह्यात आर्याली अमृतसिंह चव्हाण हिने लॉन टेनिससारख्या विदेशी खेळात सलग दहा ते १२ वर्षे सातत्याने यश मिळवित जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या यशात तिचे वडील प्रशिक्षक अमृतसिंह आणि कुटुंबीयांचे योगदान आहे. आर्यालीने वयाच्या दहाव्या वर्षापासून लॉन टेनिसचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला. राज्यस्तरीय आंतरशालेय स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटात तिने कास्यपदक मिळविल्यानंतर तिने पाठीमागे वळून पाहिले नाही. एकेक स्पर्धा खेळत तिने यशाची कमान चढती ठेवत आतापर्यंत एकूण ५२ वेळा विजेती होण्याचा मान मिळविला आहे. महाराष्ट्र संघाचे नेतृत्वही तिने केले आहे. सलग दहा राष्ट्रीय स्पर्धा खेळून तिने या क्षेत्रात रेकॉर्ड केले आहे. अनेक खुल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेची विजेतेपद तिच्याकडे आहेत. सलग सहा वेळा राष्ट्रीय आंतरशालेय लॉन टेनिस स्पर्धा, चार वेळा राष्ट्रीय महिला स्पर्धा, अखिल भारतीय स्तरावरील नामांकन स्पर्धेत अनेकदा विजेतेपद, श्री शिवाजी विद्यापीठ संघाचे दोन वेळा तसेच भारती विद्यापीठ संघाचे एका वेळा कर्णधारपद तिने भुषविले आहे. अखिल भारतीय स्तरावर ज्युनिअर गटातील स्पर्धेत १६ वेळा अजिंक्‍यपद, वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत नऊ वेळा अजिंक्‍यपद तिने मिळविले आहे. ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे, हे तिचे ध्येय आहे.

सापांची दोस्त... - मृण्मयी जाधव
साप हा शब्द उच्चारला तरी भल्याभल्यांची गाळण उडते. त्यामुळेच साप पाहिला, की आपल्याला सर्पमित्रांची आठवण येते. सर्पमित्र शास्त्रोक्त पद्धतीने सापाला पकडून पुन्हा निसर्गामध्ये सोडून देतो. पर्यावरणाच्या दृष्टीने हे काम खूप महत्त्वाचे ठरते. आपल्या अवतीभवती आपल्याला सर्पमित्र खूप दिसतात; परंतु सर्पमैत्रीण मात्र अभावानेच आढळतात. कोणतीही महिला किंवा मुलगी साप पकडतेय, हे ऐकूनच आपल्याला आश्‍चर्य वाटते. कोंडव्याची मृण्मयी जाधव ही अशीच एक सर्पमैत्रीण. विषारी किंवा बिनविषारी सापाला पकडून पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडणे हा तिचा स्थायीभाव बनून गेला आहे. जणू काही सापांशी दोस्ती केल्यासारखी कृती करत तिने आजतागायत शेकडो सापांना जीवदानच दिले आहे. जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात ती शिकते. वडील पाटबंधारे विभागात अभियंता, तर आई सामाजिक कार्यात. लहानपणी सापांना प्रचंड घाबरणारी मृण्मयी आता लीलया साप पकडते, याचे नवल वाटते. तिचा मामा स्वप्नील साळुंखे सर्पमित्र. त्याच्यामुळे तिची भीती  दूर झाली आणि ती साप पकडायला लागली.

दोन वर्षांत कोंडवे, जकातवाडी आणि परिसरातील शेकडो सापांना पकडून तिने जंगलात नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले आहे. सापांविषयी भरपूर वाचन तिने केले. साप, त्यांचे प्रकार, त्यांचे जगणे अभ्यासून ती सापांची मैत्रीण बनली आहे. त्यामुळेच पर्यावरणाशीही आगळे नाते तिने जोडले आहे. साप पकडण्याच्या प्रशिक्षणाबरोबरच पर्यावरणाच्या अनुषंगाने ती जागृतीचे उपक्रम करते. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करून प्रबोधनाचे कामही ती करते. आगळेवेगळे काम करणारी ही युवती कोणत्याही क्षेत्रातील काम मनापासून करण्यासाठी प्रेरकच आहे.

Web Title: marathi news satara women World women day