शिवसागरातील बेटांचे पर्यटकांना आकर्षण

सूर्यकांत पवार
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

कास - सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पाण्यात बुडालेल्या टेकड्या उघड्या पडू लागल्या आहेत. या टेकड्या पर्यटकांसाठी बेटं होऊ लागली आहेत. या ठिकाणी कुटुंबीयांसह रममाण होण्यात पर्यटक पसंती देत आहेत.

कास - सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पाण्यात बुडालेल्या टेकड्या उघड्या पडू लागल्या आहेत. या टेकड्या पर्यटकांसाठी बेटं होऊ लागली आहेत. या ठिकाणी कुटुंबीयांसह रममाण होण्यात पर्यटक पसंती देत आहेत.

कोयना धरणातील पाण्याच्या फुगवट्यापासून तयार झालेला  अथांग शिवसागर जलाशय. १०५  टीएमसीच्या या जलाशयाचा पसारा कोयना धरणापासून तापोळा गावाच्या दोन्ही बाजूच्या सोळशी व कोयना  नदी खोऱ्यातील अनेक गावांपर्यंत  पसरला आहे. या वर्षी पावसाने समाधानकारक कामगिरी केल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. आता फेब्रुवारी निम्मा संपल्यावर कोयनेची पाणीपातळी घटत चालली आहे. घटलेल्या पाणी पातळीमुळे जलाशयातील बुडालेल्या टेकड्यांची बेटं दिसू लागली आहेत. 

चारही बाजूने पाणी व मध्येच जमीन अशा सुंदर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना या बेटांवर जाण्याचा मोह होत आहे. त्यातूनच अशा बेटांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. 

पाटण, जावळी व महाबळेश्वर अशा तीन तालुक्‍यांत पसरलेल्या शिवसागर जलाशयाचा धरणापासून ते उगमापर्यंत अंतराचे दृष्टीने ६४ किलोमीटरचा  पसारा पसरलेला आहे. बामणोली व  तापोळा या ठिकाणी पर्यटकांची वर्षभर रेलचेल असते. त्यामध्ये सर्वांना आवडतो तो इथला घनदाट जंगलाचा निसर्ग व बोटिंग. वेगवेगळ्या प्रकारच्या बोटींमधून पर्यटक जलविहाराचा आनंद घेतात. उन्हाळ्याच्या चाहूलीमुळे पाणीपातळी घटू लागल्याने कोयनेच्या पात्रात बुडालेल्या टेकड्या सर्वप्रथम दिसण्यास सुरवात होते. सभोवताली पाणी व आजूबाजूला निरव शांतता असल्याने पर्यटकांना या शांत बेटांचे आकर्षण वाटते. मग बोट घेऊन कुटुंबीयांसह अशा बेटांवर लोक दिवसभर रममाण होऊन जात आहेत. या बेटांचा नजाराही सुंदर दिसत असल्याने लांबूनही त्यांची छबी टिपण्याची कसरत पर्यटक करताना दिसतात. 

बोटिंगचा थरार अजून महिनाभरच...!
उन्हाळ्याच्या चाहुलीमुळे शिवसागर जलाशयातील पाण्याची पातळी घटत जाणार असल्याने जलाशयातील जमीन उघडी पडण्यास सुरवात झाली आहे. कोयनानगर, बामणोली व तापोळा येथे होणारा बोटिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांना महिनाभरात संधी साधावी लागणार आहे. पाण्याच्या पातळीत आणखी घट झाल्यास बोटिंगवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news shivsagar boting turiost kaas koyna dam