लाचेची मागणी करणाऱ्या शिपायाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

जात वैधता प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी पन्नास हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या शिपायास गुरुवारी अटक करण्यात आली आहे. याबाबत सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर - विभागीय जात वैधता पडताळणी समिती क्रमांक 1 या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून जात वैधता प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी पन्नास हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या शिपायास गुरुवारी अटक करण्यात आली आहे. याबाबत सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

चंद्रसेन दऱ्याप्पा जाधव (वय 45, रा. सोलापूर) असे लाचेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार हे शिक्षक आहेत. त्यांच्या मुलीच्या नावाने जात वैधता प्रमाणपत्र हवे असल्याने त्यांनी विभागीय जात वैधता पडताळणी कार्यालयाकडे अर्ज केला होता. 

समिती सदस्य कार्यालयातील शिपाई चंद्रसेन जाधव याने वरिष्ठांना सांगून जात वैधता प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. 18 डिसेंबर 2018 रोजी लाचेची मागणी केल्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. लाचेची मागणी केल्याबाबतचा व्हीडीओही करण्यात आला होता. शिपाई जाधव यास शंका आल्याने त्याने पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात तक्रारदार यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असून पुराव्याच्या आधारे शिपाई जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली असून शिपाई जाधव यास अटक करण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांनी सांगितले. 

Web Title: marathi news solapur bribe worker arrested