आता तरी 'बार्शी पुतळा पार्क पॅटर्न' लागू करा

अभय दिवाणजी
मंगळवार, 13 मार्च 2018

संपूर्ण देशात आदर्श घालून दिलेला पुतळ्यांबाबतचा "बार्शी पॅटर्न' आता खरोखर कौतुकाचाच विषय ठरू लागला आहे. सोलापूर महापालिकेबरोबरच राज्य व केंद्र शासनानेही या पॅटर्नबाबत विचार करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. हैदराबादलाही हुसेनसागर तलावाभोवती बागेत सर्व पुतळे एकत्रित आणल्याने तेथील सौंदर्यात मोठी भरच पडली आहे. सोलापूर शहरातील सर्वच पुतळे एकाच ठिकाणी आणून बसवावेत यासाठी महापालिकेच्या सभेत एकदा प्रस्तावही दाखल झाला. परंतु नंतर मात्र त्याचे काय झाले, हे समजले नाही. खरोखरच "बार्शी पॅटर्न' लागू झाल्यास संभाजी तलावाच्या सुशोभिकरणाबरोबरच अनेक अडचणींचा सामना करणे टळणार आहे, हे निश्‍चित !

त्रिपुरातील निवडणुकीनंतर तेथे राजकीय बदल झाले. त्याचा परिणाम म्हणून की काय तेथील लेनिनच्या पुतळ्यावर "संक्रांत'च आली. त्यानंतर अनेक राज्यात या घटनेचे पडसाद उमटले. जनक्षोभाबरोबरच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍न निर्माण होऊ लागला. सोलापूर जिल्ह्यात काही कटू घटना घडल्या नाहीत. परंतु जनक्षोभापूर्वीच तोडगा म्हणून हैदराबादच्या हुसेनसागर पॅटर्नचा विचार केला तर... इतके दूर कशाला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पॅटर्नचा विचार करता सोलापुरात संभाजी तलाव परिसराचे सुशोभिकरण करताना पुतळ्यांचाही विचार झाल्यास उत्तम होईल.

सोलापुरातील सर्व पुतळे एकाच ठिकाणी बसविण्याचा प्रस्ताव तत्कालिन महापालिका आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी तयार केला होता. त्यासाठी 2009-10 च्या अंदाजपत्रकात पन्नास लाख रुपयांची तरतूद सुचविण्यात आली होती. त्यासाठी जागेची पाहणीही सुरू केली होती.

मात्र ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. शहरातील काही प्रमुख चौक, उद्यानांमध्ये सुमारे 34 पुतळे आहेत. त्यामध्ये अर्धपुतळे व पूर्णाकृती पुतळ्यांचा समावेश आहे. काही ठिकाणच्या पुतळ्याजवळच्या परिसराची निगा व पुतळ्याच्या संरक्षणाबाबत नागरिकांकडून बऱ्याचवेळा तक्रारी येत असतात. शहराच्या सौंदर्यात भर पाडणे व नागरिकांच्या पुतळ्याबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्याबाबत शहरातील विविध पुतळे एकत्रित आणून आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देता येईल. नागरिकांना सर्व पुतळे एकत्रित पाहणे व त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. हा विचार थोडासा क्रांतीकारक वाटेल. परंतु बार्शी, हैदराबाद येथे तो प्रत्यक्षात आला आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी विचार करावा असे वाटते. नागरिकांनी दबाव गट म्हणून यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

शहरातील काही अनेक चौकांचे नामकरण संबंधित पुतळ्यामुळेच झाले आहे. तो परिसरही त्याच नावाने ओळखला जातो. प्रत्येक पुतळ्याभोवती लोकभावना गुंतल्याने यावरूनही वादंग निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु या पुतळ्यांची आठवण वर्षभरातून जयंती अथवा पुण्यतिथीलाच येत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे उर्वरित 363 दिवस हे पुतळे दुर्लक्षितच दिसतात.

बार्शीतील पुतळा पार्क
कायद्या व सुव्यवस्थेबरोबरच शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने बार्शीतील विविध भागांतील महापुरुषांचे पुतळे एकाच जागी स्थलांतरित करण्याचा निर्णय 2010 मध्ये नगरपालिकेने घेतला. "पुतळा पार्क' ही अभिनव संकल्पना राज्यभर गाजली आहे. या संकल्पनेचा अभिनव ठराव त्यावेळी सभागृहात सर्वानुमते मंजूर झाला.

शहरातील विविध भागातील पुतळे न्यायालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी बसवण्यात आले. सर्वच पुतळे एकाच जागी स्थलांतरित करण्याचा निर्णय जेव्हा बार्शी नागरपालिकेने घेतला तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात हा विषय मंजुरीसाठी आला. पुतळे स्थलांतरणाबाबत शासनाचे कोणतेच धोरण नसल्याचे माहिती पुढे आली. बार्शीकरांचा हा पॅटर्न महत्वाचा असल्याने आमदार दिलीप सोपल यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन शासनाचे धोरण स्पष्ट करीत या संकल्पनेचे स्वागत केले. या संकल्पनेमुळे पोलिस-प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदतच होणार असल्याचे सांगत योजनेचे कौतुकच केले. बार्शीतील सर्व पुतळे एका जागी नेऊन बंदिस्त करणे योग्य नसल्याची भूमिका काही लोकांनी घेतली होती. तेव्हा पोलिस बंदोबस्तात एका रात्रीत नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी विविध भागांतील सर्व पुतळे न्यायालयासमोर असलेल्या पार्कमध्ये स्थलांतरित केले होते.

Web Title: marathi news solapur news barshi statue park pattern