सोलापूर: पोटनिवडणुकीच्या पहिल्याच घासाला 'खडा' 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

राज्य निवडणूक आयोगाकडून 29 हजार 076 मतदारांची यादी प्राप्त झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ती प्रसिद्ध करता आली नाही. आयोगाकडून "ग्रीन सिग्नल' आला की यादी लगेच कार्यालयाबाहेर तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. 
- रामचंद्र पेंटर, मतदार यादी प्रमुख महापालिका निवडणूक कार्यालय

सोलापूर : महापालिका पोटनिवडणुकीच्या पहिल्याचा घासाला (प्रक्रिया) "खडा' लागला असून, नियोजित तारीख उलटून 3 दिवस झाले, अद्याप प्रारूप मतदार यादी गुलदस्त्यातच आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार 17 फेब्रुवारी रोजी यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. 

महापालिका प्रभाग "14- क'मधील कॉंग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राज्यातील पाच महापालिकांतील आठ ठिकाणच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने 7 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 17 फेब्रुवारी रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त न झाल्याने ती प्रसिद्ध झाली नाही. त्यानंतर काल (रविवार) आणि आज (सोमवार) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुटी असल्याने यादी प्रसिद्ध झालेली नाही. 

या पोटनिवडणुकीसाठी 1 जानेवारी 2018 ही अर्हता दिनांक निश्‍चित धरून आणि 10 जानेवारीपर्यंत अस्तित्वात असलेल्या यादीवर आधारित प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात 28 हजार 714 मतदार होते, त्यापैकी 14 हजार 02 महिला, तर 14 हजार 712 पुरुष होते. नव्या यादीनुसार किमान दोन ते अडीच हजार नवमतदारांची भर अपेक्षित आहे. मात्र यादी प्रसिद्ध न झाल्याने मतदार वाढले की कमी झाले, याबाबतही काहीच स्पष्ट झालेले नाही. 

असे आहे वेळापत्रक 
- 26 फेब्रुवारीपर्यंत हरकती स्वीकारणार 
- 27 फेब्रुवारीला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध 
- 8 मार्चला मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध 

राज्य निवडणूक आयोगाकडून 29 हजार 076 मतदारांची यादी प्राप्त झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ती प्रसिद्ध करता आली नाही. आयोगाकडून "ग्रीन सिग्नल' आला की यादी लगेच कार्यालयाबाहेर तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. 
- रामचंद्र पेंटर, मतदार यादी प्रमुख महापालिका निवडणूक कार्यालय

Web Title: Marathi news Solapur news bypoll