आर्थिक लाभ, नोकरी अन्‌ गिफ्टचे आमिष दाखवून 'फिशिंग'!

cheating
cheating

सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा असलेला टी-शर्ट फ्री देण्यात येणार आहे.., एका स्मार्टफोनच्या खरेदीवर एक स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळवा.., मोजक्‍या तरुणांना परदेशातील नोकरीची संधी.., ब्रॅंडेड कंपनीची वस्तू स्वस्तात मिळवा.. यासारख्या मेसेजच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती चोरली जात आहे. यातून फसवणुकीचे प्रकार वाढत असून सायबर क्षेत्रात याला "फिशिंग' म्हटले जाते. खात्री न करता आर्थिक लाभ, नोकरी अन्‌ गिफ्टच्या अपेक्षेने वैयक्तिक माहिती लिंकवर भरल्याने सायबर गुन्हेगारांच्या गळाला "मासे' सहजच सापडत आहेत. 

"फिशिंग'मध्ये आपले सोशल मीडिया, बॅंकिंग व एटीएम कार्डचे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. "विशिंग' हा फिशिंगचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये फोनवरून आपली संवेदनशील माहिती विचारण्यात येते. मूळ संकेतस्थळासारखे दिसणारे बनावट संकेतस्थळ बनवून ग्राहकांना फसवून त्यांची संवेदनशील माहिती चोरण्यात येते. ई-मेल किंवा फोन मेसेजवरून बनावट वेबलिंक पाठवून आपली माहिती चोरली जाते. आपल्या मोबाईलवर अथवा व्हॉट्‌सऍपवर एखादी फ्री गिफ्ट किंवा मोबाईल फ्री यासारखे मोहक ऑफर असणारे मेसेज पाठवले जातात. लिंकवर क्‍लिक करण्यास प्रवृत्त केले जाते. बहुतांश वेळा मोहापायी अनेकजण लिंकवर जातात आणि आपली वैयक्तिक माहिती अपडेट करतात. सायबर गुन्हेगार चोरलेल्या माहितीचा वापर आपल्या बॅंक खात्यावरील पैसे चोरण्यासाठी, फेसबुक अकाउंट हॅक करण्यासाठी, अथवा बदनामी करण्यास वापरतात. 

मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरांमध्ये हा प्रकार अधिक आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण सायबर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही फिशिंगचे प्रकार घडत आहेत, पण अद्याप याप्रकारची तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय 
- कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ई-मेलवर क्‍लिक करू नका. 
- त्यांनी विचारलेली कोणतीही संवेदनशील माहिती पुरवू नका. 
- अनोळखी व्यक्तीने व्हॉट्‌सऍप किंवा अन्य माध्यमातून पाठवलेल्या लिंक्‍स उघडू नका, त्या लगेच डिलीट करा. 
- व्हॉट्‌सऍप, ई-मेलवर आलेले आमिष दाखवणारे मेसेज फॉरवर्ड करू नका. 
- https ने सुरवात होणाऱ्या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करा. 

वळसंगच्या तरुणाची फसवणूक 
परदेशात नोकरी लावतो म्हणून वळसंगच्या एका तरुणाची वैयक्तिक माहिती चोरून फसवणूक करण्यात आली. संबंधित कंपनीकडून त्याला परदेशात जाण्यासाठी विमानाचे तिकीट पाठविण्यात आले. त्याला ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. नोकरीच्या अपेक्षेने त्याने जवळपास लाखभर रुपये पाठविले. नंतर कंपनीने संपर्क बंद केला आणि विमानाचे तिकीट रद्द करण्यात आले. या घटनेनंतर तो सायबर पोलिसात आला, पण त्याने फिर्याद दिली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com