रामदेवबाबा मानपत्र प्रकरण:महापौरांचा 'पीए' बळीचा बकरा 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 20 मार्च 2018

सोलापूर - योगगुरू रामदेवबाबा यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देण्याच्या प्रकरणावरून महापालिकेत बराच गदारोळ झाला असून, महापौरांच्या "पीए'ला बळीचा बकरा करण्यात आले आहे. पीए मल्लू यांची सोमवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. 

सोलापूर - योगगुरू रामदेवबाबा यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देण्याच्या प्रकरणावरून महापालिकेत बराच गदारोळ झाला असून, महापौरांच्या "पीए'ला बळीचा बकरा करण्यात आले आहे. पीए मल्लू यांची सोमवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. 

मेळाव्यासाठी महापालिकेने पार्क स्टेडियम मोफत दिले होते. तरीसुद्धा त्या संस्थेने कार्यक्रम पत्रिकेत मानपत्र देण्याचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर बळेबळेच रामदेवबाबांना मानपत्र देण्यात आल्याची चर्चा आहे. हजारो रुपये भाडे असलेले मैदान मोफत देण्याची "मेहरबानी' दाखविण्यात आलेल्या संस्थेला आता पदाधिकारी जाब विचारणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान, ठराव नसतानाही ठराविक लोकांना घेऊन मानपत्र देण्यात आल्याची टीका सोशल मिडीयावरून भाजप नगरसेवकांकडूनच सुरु झाली आहे. पालकमंत्री गटातील नगरसेवकाने ही टीका केली असती तर गटबाजीचा एक प्रकार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण सहकारमंत्र्यांचे कट्टर समर्थक असलेल्या राजेश काळे यांनीच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मानपत्र देण्याचा ठराव झाला नसला तरी, विरोधी पक्षातील गटनेत्यांनीही ठरावाशिवाय मानपत्र देण्यास संमती दिली होती. त्यामुळे त्यांनाही मानपत्र देतेवेळी बोलावणे आवश्‍यक होते. पण त्यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही, त्यामुळे तेही नाराज झाले आहेत. 

मानपत्र ज्यांनी द्यायला हवे त्यापैकी महापौरवगळता कोणीही नव्हते. यामुळे अत्यंत चुकीचा प्रघात पडला आहे. मानपत्र कुणाच्या का खर्चाने दिले, तरी ते प्रदान करताना महापौरांनी "गाऊन' घालणे आवश्‍यक होते. या प्रकाराची शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्याकडे तक्रार केली आहे. 
- संजय कोळी, पक्षनेता 

मानपत्र देण्यासाठी मंजुरी देण्याची विनंती महापौरांनी केली, त्यामुळे आम्ही ते दिली. मात्र ते प्रदान करतेवेळी आम्हाला बोलावण्यातही आले नाही. मानपत्र देतेवेळी सर्व पदाधिकारी उपस्थित असणे आवश्‍यक होते. 
- महेश कोठे, विरोधी पक्षनेता 

मानपत्र हे महापालिकेच्या वतीने दिले की विशिष्ट गटाकडून. मानपत्र देण्याबाबत दुमत नाही, मात्र पालिकेच्या वतीने मानपत्र असेल तर उपमहापौर, पक्षनेता, विरोधी पक्ष नेता, सर्व सभापती, गटनेते उपस्थित असणे गरजेचे होते. 
- राजेश काळे, नगरसेवक, भाजप 

Web Title: marathi news solapur news ramdev baba Solapur Municipal Corporation