स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी सौरप्रकल्प 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 28 जानेवारी 2018

शहरातील प्रमुख संस्था, शासकीय कार्यालयांवर 'सोलर रुफ टॉप' प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत हे काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेतील प्रशासकीय इमारत आणि कौन्सिल हॉल, स्मृती मंदिर, शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. या कामासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीकडून आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे.

सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पुण्यातील 'व्हॉल्टेज इन्फ्रा' कंपनी हा प्रकल्प पूर्ण करणार असून, प्रकल्पाची एकूण किंमत 3 कोटी 2 लाख रुपये आहे. मे 2018 अखेर हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. 

शहरातील प्रमुख संस्था, शासकीय कार्यालयांवर 'सोलर रुफ टॉप' प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत हे काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेतील प्रशासकीय इमारत आणि कौन्सिल हॉल, स्मृती मंदिर, शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. या कामासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीकडून आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पाची सुरवात होणार असून, तीन ते चार महिन्यांत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. महापालिका व स्मृती मंदिर येथे प्रत्येकी 50 किलोवॉट, तर शासकीय रुग्णालयात 450 किलोवॉट व वैद्यकीय महाविद्यालयात 150 वॉटचा प्रकल्प असेल. 

दुसऱ्या टप्प्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र, इंदिरा गांधी स्टेडियम आणि काही प्रमुख शासकीय कार्यालयांचा समावेश असणार आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्र सौरऊर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विजेवर होणारा खर्च वाचविण्याबरोबरच गरज भासेल, तेव्हा उपलब्ध होणाऱ्या विजेची निर्मिती महापालिका करणार आहे. हा प्रकल्प राबविल्यामुळे विजेवर होणाऱ्या खर्चात जवळपास 50 टक्के बचत होणार आहे. 

कडक उन्हाळ्याचा होणार फायदा 

अन्न वस्त्र निवारा याबरोबरच 'ऊर्जा' ही आधुनिक युगातील मानवाची चौथी मूलभूत गरज बनली आहे. ऊर्जेच्या विविध स्त्रोतांपैकी सौरऊर्जा भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

विजेचा दरवर्षी वाढणारा दर; तसेच भारनियमन यांच्या पार्श्‍वभूमीवर सौर उपकरण एकदा खरेदी केल्यावर त्यापासून अल्पशुल्क व अमर्याद ऊर्जा उपलब्ध होऊ शकते. भारतात अंदाजे 300 दिवस सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. कडक उन्हाळ्याची सोलापूरला देणगी आहे. त्याचा वापर करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील ठिकाणे : 05 

प्रकल्पाची एकूण क्षमता : 700 किलोवॉट 

प्रकल्पासाठी येणारा खर्च रुपये : 03.02 कोटी 

विजेच्या बिलात होणारी बचत : 50 टक्के 

Web Title: Marathi news solapur news solar project first 5 stages