घरट्यासाठी कोपरा दिल्यास पुन्हा वाढेल चिवचिवाट! 

परशुराम कोकणे 
मंगळवार, 20 मार्च 2018

सोलापूर - लहानपणी अंगणात, खिडकीत चिवचिवाट करत दिसणाऱ्या चिमण्या आता दिसेनाशा झाल्या आहेत.. असे वाटते असेल तर थोडसं विचार करा. आनंदी आयुष्य जगण्याचा संदेश देणाऱ्या चिमण्यांना पुन्हा एकदा आपण घराच्या परिसरात बोलावू शकतो. त्यांच्यासाठी आपल्या घराच्या परिसरात पोषक वातावरण तयार केल्यास चिवचिवाट वाढायला वेळ लागणार नाही. 

सोलापूर - लहानपणी अंगणात, खिडकीत चिवचिवाट करत दिसणाऱ्या चिमण्या आता दिसेनाशा झाल्या आहेत.. असे वाटते असेल तर थोडसं विचार करा. आनंदी आयुष्य जगण्याचा संदेश देणाऱ्या चिमण्यांना पुन्हा एकदा आपण घराच्या परिसरात बोलावू शकतो. त्यांच्यासाठी आपल्या घराच्या परिसरात पोषक वातावरण तयार केल्यास चिवचिवाट वाढायला वेळ लागणार नाही. 

जगभरात आढळून येणाऱ्या चिमण्या आजच्या घडीला संकटात सापडल्या आहेत. त्याला माणूसच कारणीभूत आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातूनही चिमण्या हद्दपार होत आहेत. पूर्वीच्या काळी घरे माळवदाची असायची, बैठकीच्या खोली मध्ये फोटो असायचे. त्यांच्या मागे आणि कोपऱ्यात चिमण्या आपली घरटी बनवत. आता हा कोपराच नाहीसा झाला आहे. आजच्या जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने चिमणीला घरट्यासाठी कोपरा मिळवून देण्याचा संकल्प साऱ्यांनी करायला हवा. 

एक घास चिऊचा.. 
मनुष्य वस्तीत वास्तव्याला असलेल्या चिमण्यांना इंग्रजीत हाऊस स्पॅरो असे म्हणतात तर त्यांना पॅसर डोमेस्टिकस हे शास्त्रीय नाव दिले आहे. पॅसर म्हणजे झाडांच्या फांद्यांवर बसून गाणारा छोटा पक्षी. डोमेस्टिकस म्हणजे पाळीव, घरगुती. पर्यावरणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे पक्षी माणसाशी विशिष्ठ नाते जोडून आहेत. त्यापैकी चिमणी एक असा पक्षी आहे की तो माणसाशी अतीशय सलगी करून राहतो. माणूस जन्माला आला की त्याला ओळख होणारा पहिला पक्षी म्हणजे चिमणी! आईने एक घास चिऊचा म्हणत तुम्हाला लहाणपणी घास भरविला असेलच. 

शिकारी पक्ष्यांपासून चिमणीला धोका असतो. चिमणी स्वत:च्या घराचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे ती मनुष्य वस्तीमध्ये राहते. अलीकडे सिमेंट क्रॉक्रिंगची घरे वाढल्याने चिमणीला घरटे करायला कोपरा मिळेनासा झाला आहे. दारामध्ये फरशीकरण झाले आहे, घराच्या परिसरात शोची झाडे वाढली आहेत. चिमणीसाठी कृत्रिम घरटे तयार केल्यास ती स्वीकारते. 
- मुकुंद शेटे, पर्यावरण अभ्यासक 

आपल्यापासून दुरावलेल्या चिमण्यांना परत येऊ शकतात. घराच्या परिसरात वृक्षारोपण करा. चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करा. मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था करा. आंगणात व गच्चीवर रोज पसाभर तांदूळ, ज्वारी, बाजरी आदी धान्य पसरवून टाका. पोषक वातावरण मिळाले तर चिवचिवाट पुन्हा वाढायला वेळ लागणार नाही. 
- प्रा. रश्‍मी माने, अध्यक्षा, युगंधर ग्रीन आर्मी

Web Title: marathi news sparrow bird