गड्या आपुला गाव बरा... 

गड्या आपुला गाव बरा... 

सातारा - पाच-दहा एकराचे मालक व पाण्याअभावी त्यांना हलाखीचे दिवस काढावे लागले. शेती पडून ठेवून पोटापाण्यासाठी काहींनी शहरांची वाट धरली. मिळेल ते काम करून, हातगाड्या चालवून पोटं भरली. परंतु, गेल्या दोन वर्षांत "गड्या आपुला गाव बरा म्हणत' यातील काही चाकरमानी मंडळी गावाकडे परतू लागली आहेत. कंबर कसून शेती करू लागली आहेत. ज्यात कुसळही येत नव्हती, त्याच जमिनीत गहू, स्टॉबेरी, कांदा, आलं आदी पिकं घ्यायला लागली, फळबागा फुलू लागल्या. ही किमया साधली आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे! 

अनपटवाडीत बदलत चाललेले हे चित्र आहे. कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तर भागात डोंगराच्या पायथ्याला वसलेले हे सुमारे 500 उंबऱ्याचं गाव. परतीचा पाऊस ग्रामस्थांनी कधी गावात पाहिलाच नाही. वर्षाला कसाबसा 350 ते 400 मिलिमीटर एवढाच पाऊस येथे होतो. त्यामुळे टंचाईमध्ये मोडणारे हे गाव. 2016 मध्ये गावात जलयुक्त शिवार योजनेतून कामे सुरू झाली. अन्‌ दोन वर्षांत ग्रामस्थांनी केलेल्या कष्टाला आता फळे मिळू लागली आहेत. कल्पना कोणतीही असो त्याचे शासकीयीकरण झाले की चांगल्या योजनेचं "कल्याण' झालं, असा अनुभव सांगतो. अनपटवाडी हे गाव मात्र याला अपवाद ठरले. जलयुक्त शिवार योजनेतून गावातील मातीनाला बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे गावाने ठरवले. योजनेत गाव बसल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली. 

लोकसहभाग म्हणून श्रमदान करण्याचा निर्णय गावाने घेतला खरा; परंतु श्रमदानाच्या पहिल्याच दिवशी कामावर अवघे तीन ग्रामस्थ श्रमदानाला आलेले. परंतु, त्यातूनही त्यांनी हार मानली नाही. काम पुढे चालत राहिले. सुरवातीस मूठभर असलेल्या ग्रामस्थांच्या जिद्दीला इतरांची साथ मिळत गेली. बघता-बघता एकएका दिवशी श्रमदानाला हजार लोकांची हजेरी लागू लागली. मातीनाला बंधारा खोलीकरण, ओढा खोलीकरण, मातीचे बंधारे, पाझर तलाव, माती व सिमेंट साखळी बंधारे, सलग समतल चर खोदाई आदींच्या माध्यमातून गावात काम उभे राहिले. वर्षानुवर्षांच्या पाणीटंचाईने लोक पिचले होते. नैसर्गिक संकटाशी त्यांनी निर्धाराने दोन हात केले. कागदावर सरकारी आकडेवारी काहीही सांगत असली तरी त्याची खात्री प्रत्यक्ष गावात गेल्यानंतर समक्ष पटते. या "जलयुक्त' योजनेने केवळ पाणी अडवण्याचे काम साधले नाही तर लोकांची मनेही सांधली गेली आहेत. 

पिकं डोलू लागली...  
अनपटवाडीकरांनी सुमारे चार किलोमीटरचा पाणंद रस्ता श्रमदानातून केला. एवढ्यावरच काम थांबले नाही, त्यांनी दीड किलोमीटरचा डांबरी रस्ताही लोकसभागातून केला. बंधाऱ्यातून काढलेल्या गाळ मातीतून माळावर शेतजमीन तयार केली. सुमारे 50 एकर क्षेत्रावर गाळ पसरविल्याने हलकी जमीन मध्यम झाली. याच जमिनीतून आता पिकं डोलू लागली आहेत. 26 एकर क्षेत्रावर कांदा बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम कृषी विभागाने राबविला. बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांना अंदाजे 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न मिळाले. 

टॅंकरची घरघर बंद  
सन 2016 पर्यंत नोव्हेंबर सुरू झाला की, गावात टॅंकरची घरघर सुरू व्हायची. 2017 मध्ये अनपटवाडी परिसरात अवघा 120 मिलिमीटर पाऊस होऊनसुद्धा 15 एप्रिल 17 पर्यंत गावात टॅंकर लागला नाही. दोन वर्षांत गावातील विहिरींमधील सरासरी पाणीपातळी 15 मीटरवरून नऊ मीटरपर्यंत वाढली. 60 विहिरी व 20 कूपनलिकांचे पुनरुज्जीवन झाले. 

नोकऱ्या सोडून गावाकडे... 
मनोहर नलवडे यांची सात एकर पडीक शेती. लोणंद येथे ते टेलरिंगचा व्यवसाय करत होते. गावात जलसंधारणाची कामे सुरू झाली. नलवडे यांचा गावाकडे ओढा वाढला. त्यांनी गावी येऊन पडजमीन विकसित केली. झेंडू, कांदा लागवड करून त्यांनी अर्ध्या एकरातून दीड लाखांचे उत्पन्न घेतले. अनिल अनपट नोकरी सोडून गावाकडे आले. ज्या रानात ज्वारी करण्याचेही धारिष्ट कोणी दाखवू शकणार  नाही, त्याच रानात त्यांनी "ठिबक'वर गहू केलाय. योगेश बोबडे, सुरेश बोबडे, धनंजय अनपट,  भरत मुळीक, प्रदीप बोबडे, अरविंद मुळीक... अशी किती तरी शेतकऱ्यांची नावे घेता येतील. गेल्या दोन वर्षांत शेतात, विहिरीतील पाणीपातळीत, उत्पन्नामध्ये आणि मुख्यत: माणसांच्या मनामध्ये झालेला फरक ही मंडळी मोठ्या अभिमानाने गावात शिवारफेरीसाठी येणाऱ्या लोकांना सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com