'मराठी तारका'ला सांगलीकरांचा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

सांगली : एरवी पोलिस मुख्यालय मैदानावर पोलिसांचे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी व्हायची. आज अगळा-वेगळाच रंग होता. मराठी तारका कार्यक्रमाचे निमित्त होते. दिलखेचक अदा, ढंगदार लावण्या, डोलायला लावणारी गाणी, नकलांचा मसाला असं सारं काही होतं. पोलिस कुटुंबीयांसह सांगलीकरांनी एन्जॉय केले. 

सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार सुरेश खाडे, मोहनराव कदम, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. 
अतुल तोडणकर, शशिकांत केरकर या हास्यसम्राटांनी रंगमंचाचा ताबा घेतला. रसिकांना पोट धरून हसायला लावत हास्यसम्राटांनी टाळ्या घेतल्या. त्यानंतर तेजा देवकर हिने सादर केलेल्या नृत्याला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली. गायक विश्वजित बोरवणकरने बाजीराव मस्तानीतील गाण्याला टाळ्या घेतल्या. खास कोलकत्त्याहून आलेल्या आरुणिता या गायिकेनेही गाण्यांवर रसिकांना डोलायला लावले. 

'वाजले की बारा'ला टाळ्या 
भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी यांच्या नृत्यांनाही रसिकांनी दाद दिली. त्यातील 'वाजले की बारा' ला तर मंडप टाळ्यांनी कडकडत होता. हिंदी गाण्यांवर सादर केलेल्या अमृता खानविलकरच्या नृत्यावेळी तर टाळ्यांचा पाऊस पडला. कार्तिकी गायकवाडच्या 'खंडेरायाच्या लग्नाला' यासह सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी डोक्‍यावर घेतले. निवेदक अभिजित खांडकेकर यांनी उत्तम पद्धतीने कार्यक्रम गुंफला. स्मिता शेवाळे, केतकी पालव यांच्या नृत्यांनाही चांगली दाद मिळाली. 

Web Title: marathi tarka gets response in sangli