मराठवाडीच्या पुराचा विळखा ढिला 

मराठवाडीच्या पुराचा विळखा ढिला 

ढेबेवाडी  : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडी धरणातील जलाशयांतर्गत गावांना पडलेला पुराचा विळखा आता पावसाच्या उघडिपीमुळे ढिला होत चालला असला, तरी तेथील अनेक घरे, मंदिरे आणि सार्वजनिक विहिरी अजूनही पाण्यातच असल्याने समस्यांचा हा महापूर कधी हटतोय, याकडे धरणग्रस्त डोळे लावून आहेत. 
नऊ वर्षांपासून मराठवाडी धरणात 0.60 टीएमसी पाणीसाठा होत होता. यावर्षी सांडव्याचे बांधकाम केल्याने त्याची पाणी साठवण क्षमता वाढून 1.05 टीएमसी झाली आहे. अलीकडेच सलग 15 दिवस झालेल्या संततधार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. जलाशयाच्या काठावरील मेंढ, उमरकांचन, घोटील या गावांना पाण्याचा वेढा आहे. तेथील अनेक घरे, सार्वजनिक विहिरी, शेती, स्मशानभूमी पाण्यात असल्याने पाण्याची झळ पोचलेल्या काही कुटुंबांनी पाटबंधारे विभागाने उभारलेल्या निवारा शेडमध्ये संसार हलविला आहे. आता उघडिपीमुळे पाण्याची आवक जवळपास दहापटीने कमी झाल्याने आणि गेटमधूनही अखंड विसर्ग सुरू असल्याने हळूहळू पाणी ओसरत आहे. पाण्याबाहेर आलेल्या घरांत व रस्त्यांवर गाळ साचल्याचे दिसत आहे. दगड, विटा व मातीत बांधलेली जुनी घरे धडाधड कोसळत असल्याने धरणग्रस्तांच्या चिंतेत भर पडत आहे. मेंढ, उमरकांचन, घोटील येथील मंदिरांसह काही घरे आणि पाणीपुरवठ्याच्या विहिरीना अजूनही पाण्याचा वेढा कायम आहे. तो कधी हटतोय याकडे धरणग्रस्त डोळे लावून आहेत. धार्मिक सण, उत्सव जवळ आल्याने मेंढचे ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराची पुरातून लवकर सुटका व्हावी, त्यासाठी विसर्ग आणखी वाढवावा, अशी मागणी तेथील जितेंद्र पाटील व अन्य धरणग्रस्तांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com