valentine day special ; अनाथ मुलांच्या साक्षीने त्यांनी बांधल्या आयुष्याच्या गाठी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

विवाहसोहळा हा आयुष्यात एकदाच होणारा क्षण. त्यामुळे विवाह हा थाटामाटात व्हावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असणे स्वाभावीक. यासाठी प्रसंगी लाखो रुपये खर्च करुन विवाह करण्याचीही तयारी असते. पण, अवाढव्य खर्चाला फाटा देत व्हॅलेंटाईन डे दिवशी अनाथ मुलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्याचा उपक्रम शुक्रवारी (ता. 14) बेळगावात राबविण्यात आला. 

बेळगाव : विवाहसोहळा हा आयुष्यात एकदाच होणारा क्षण. त्यामुळे विवाह हा थाटामाटात व्हावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असणे स्वाभावीक. यासाठी प्रसंगी लाखो रुपये खर्च करुन विवाह करण्याचीही तयारी असते. पण, अवाढव्य खर्चाला फाटा देत व्हॅलेंटाईन डे दिवशी अनाथ मुलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्याचा उपक्रम शुक्रवारी (ता. 14) बेळगावात राबविण्यात आला. 

हे पण वाचा -  Valentine Day Special : एकतर्फी प्रेमात पडलेल्याला  व्हॅलेंटाईन डे पडला महागात..

हुक्‍केरीतील चंद्रकांत गवाणे आणि संकेश्वर येथील विणा मननाईक असे या वर-वधूचे नाव आहे. चंद्रकांत हा पूर्वीपासून अनाथ मुलांसाठी कार्य करतो. त्यामुळेच त्याने आपला विवाह अनाथ मुलांसमवेत साजरा करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्याला वधू विणानेही सहमती दर्शविली. त्यानुसार शुक्रवारी महेश फौंडेशनच्या सभागृहात हा विवाह सोहळा झाला. राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या "मंत्र मांगल्य' या संकल्पनेचा आदर्श घेऊन हा विवाह करण्यात आला. अतिखर्चात व प्रतिष्ठेतील विवाह टाळून सोप्या व साध्या पद्धतीने विवाह करणे हीच "मंत्र मांगल्य' यामागची संकल्पना आहे. मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य असून त्याचे प्रदर्शन करू नका, अशी शिकवणही ही संकल्पना देते. त्याचेच अनुकरण करत चंद्रकांत व विणा यांनी अंत्यत साधेपणाने विवाह करुन एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचे वचन दिले. 
महेश फौंडेशननेही स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच चंद्रकांत व विणा यांच्या विवाहाची उत्साहाने सर्व तयारी केली. महेश फौंडेशनच्या अनाथ मुलांनाही विवाहावेळी पाहुण्यांप्रमाणेच वागणूक देण्यात आली. त्यामुळे ही मुलेही भारावून गेली. यावेळी वधू-वराला शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश भट, शिवाजी कागणीकर, वीराण्णा मडिवाळ, दिनेश पाटील, आशा यमकनमर्डी, भावना हिरेमठ, शंकर चौगुले, महेश फौंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव, व्यवस्थापक महेश्वर हंपीहोळी आदींसह शहरातील मान्यवर उपस्थित होते. 

हे पण वाचा - Valentine Day Special ; सलाम तिच्या धाडसी निर्णयाला; कर्करोगग्रस्त प्रथमेशसोबत केला विवाह

लग्न हे दोन जीवांचे मिलन असते. त्याला मोठ्या थाटामाटाची गरज नाही. थाटामाटात विवाह करून होणाऱ्या अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन तो पैसा महेश फौंडेशनच्या अनाथ मुलांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपला विवाह साधेपणाने करण्यात आला. 
-चंद्रकांत गवाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage made by the witness of orphan children