धोका : मास्क खिशात, अन्‌ गडी रस्त्यावर सुसाट... 

दीपक पवार
गुरुवार, 28 मे 2020

गावा- गावात हाताच्या अंतरावर कोरोना आला असताना मास्क खिशात, सुरक्षिततेची साधने घरात, आणि आपण रस्त्यावर सैराट अशी काहीशी अवस्था आहे.

इटकरे (जि . सांगली) ः दूर कोसावरील कोरोनाच्या भीतीने वाळवा तालुक्‍यातील लोकांनी जीव मुठीत धरून दोन महिने स्वतःला काटेकोरपणे संभाळले. आता गावगाडा सुरू होईल तसे सुरक्षितेत ढिलाई आलीय. गावा- गावात हाताच्या अंतरावर कोरोना आला असताना मास्क खिशात, सुरक्षिततेची साधने घरात, आणि आपण रस्त्यावर सैराट अशी काहीशी अवस्था आहे. त्यांचा हा निष्काळजीपणाच कोरोनाला थेट घरी आणणार आहे. 

आपल्यापासून हजारो किलोमीटरवर दूर देशात कोरोनाचा फैलाव सुरू असताना इस्लामपूर शहरात विमान प्रवासाच्या माध्यमातून विषाणूचा शिरकाव झाला. सध्याच्या तुलनेत त्यावेळी रुग्णांचे प्रमाण खूप कमी होते; पण भीती प्रचंड होती. जिल्ह्यात अन्यत्र रुग्ण नव्हते. तरीही गाव, रस्ते, दुकाने, व्यवहार सर्वकाही कडेकोट बंद होते. सर्वच घटकांनी दीड-दोन महिने संचारबंदी पाळली.

अत्यावश्‍यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर न पडता स्वतःला डांबून घेतले. लहान मुलांपासून सर्वांनीच मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर किंवा साबणाने सतत हात धुणे, गाव पातळीवर ग्रामसुरक्षा समितीची स्थापना, बाहेरगावाहून येणाऱ्यांना गावबंदी असे अनेक खबदारीचे उपाय अमलात आणले गेले. कोरोनाचा अत्यल्प प्रभाव असताना या सर्व खबरदारीच्या उपायांच्या माध्यमातून प्रत्येकजण सजग राहिला. 

सध्या मात्र चित्र उलटे झाले आहे. लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता दिल्यामुळे पुण्या-मुंबईकडचे लोंढे गावाकडे येतायत. प्रत्येक गावात 50-100 लोक परतत आहेत. मुंबईकडून येणाऱ्या लोंढ्यामध्ये किमान एखादा पॉझिटीव्ह येतोय. कोरोना अगदी दाराबाहेर आला असताना दोन महिने काटेकोरपणे पाळलेल्या नियमांचा कंटाळा केला जातोय. नेमकी गरज असताना गांभीर्य हरवल्याचे दिसत आहे.

दिवसातून दोन-तीनवेळा होणारी पोलिसफेरी आता दुर्मिळ झालीय. लहान मुलांसह अनेकांनी मास्क टाकून दिलेत. काहींनी कारवाईच्या भीतीने केवळ खिशात बाळगलेत. व्यक्तिगत स्वच्छतेसह सुरक्षित अंतरही पाळले जात नाही, लग्न आणि इतर कार्यक्रम वाढलेत, जेवणावळी सुरू झाल्यात, शिवाय अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांना हरताळच फासला जातोय. परगावहून येणाऱ्यांना नियम कितीवेळा सांगायचे म्हणून समित्यांनी वाद टाळून दुर्लक्ष सुरू केले. 

नियमांची शस्त्रे म्यान 
नियमात आलेल्या ढिलाईचा अनेकजण गैरफायदाही घेत आहेत. कोरोनाविरुद्धच्या नेमक्‍या लढाईच्या वेळी संरक्षक साधने आणि नियमांची शस्त्रे खाली टाकल्यामुळे संबंधित लोक दाराबाहेर असलेल्या कोरोनाला सन्मानाने घरात घेऊन जातील याची भीती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mask In the pocket & people on the road