हप्ता बंद झाला तरच मटका बंद...

सुधाकर काशीद - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

कोल्हापूर - कालपर्यंत अगदी फुटकळ असलेले मटकामालक आज लाखोपती झालेत. लोकांना ओपन क्‍लोजच्या आशेवर बसवायचे व त्यांच्या खिशातील पैसे काढून आपले खिसे भरायचे हे त्यांचे कर्तृत्व. 

कोल्हापूर - कालपर्यंत अगदी फुटकळ असलेले मटकामालक आज लाखोपती झालेत. लोकांना ओपन क्‍लोजच्या आशेवर बसवायचे व त्यांच्या खिशातील पैसे काढून आपले खिसे भरायचे हे त्यांचे कर्तृत्व. 

हे करताना हप्त्याच्या जोरावर सर्व यंत्रणांना गप्प बसवायचे हे त्यांचे कौशल्य. नैतिकदृष्ट्या समाजात शून्य किंमत; पण जणू काही हे फार महत्त्वाचे गुन्हेगार असल्यासारखे रोज त्यांची चर्चा चालू आहे. त्यांना हद्दपार कसे करायचे, यासाठी डोक्‍याला डोकी लावून अधिकारी बसले आहेत. वास्तविक या मटकामालकांना जेरीस आणायचेच ठरवले तर पोलिसांना तासाभराचा अवधी पुरेसा आहे; पण मटका बंदबरोबरच हप्ता बंद झाला नाही तर मटकामालक कधीच हद्दपार होणार नाही, अशी जिल्ह्यातील स्थिती आहे.

त्यामुळे पहिल्यांदा हप्ता बंद मग तासाभरात मटका बंद करणे शक्‍य आहे. जिल्ह्यातले सर्व पोलिस अजिबात नाही; पण ठराविक पोलिसांना, काही अधिकाऱ्यांना मटक्‍याची, त्याच्या मालकांची, त्यांच्या अड्ड्याची नस आणि नस माहीत आहे. त्यांच्यावरच  मटका बंदची जबाबदारी देण्याची गरज आहे. कारण या ठराविकांनीच मटका बंद करायचे ‘मनावर’ घेतले तर मटका बंद होणार आहे. 

पण आज स्थिती अशी आहे, की मकटामालक टीव्ही चॅनेलवर पुढे येऊन, कोण किती हप्ता घेतो, हे जाहीर सांगत आहेत. मटका बंद राहूदेच पण त्या मटकामालकाला ‘तू असे बोलू नको’ असे सांगायचे नैतिक धाडस पोलिसांत उरलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

ठराविक पोलिस व काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता चक्क फुटकळ मटकामालकांना हद्दपार करायच्या कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांना बैठका घ्यायची वेळ आली आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षकपदी संजयकुमार व अतिरिक्त पोलिसप्रमुखपदी शहाजी उमाप असताना याच कोल्हापुरातल्याच पोलिसांनी मटका बंद करून दाखवला होता. कोल्हापुरातले मटकामालक फक्त पैशावर मोठे आहेत; कारण अनेकांना मटक्‍याचा नाद लावून त्यांनी मोठी कमाई केली आहे. १०० पैकी ९० लोक ज्या आकड्यावर पैसे लावतात तो आकडा कधीच येत नाही, हे मटक्‍याचे उघड रहस्य आहे. त्यामुळे ८० रुपये मटकेवाल्याच्या खिशात व २० रुपयांत इतर कारभार असा व्यवहार आहे. त्यामुळे रोज मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या या पैशातून सर्व यंत्रणातील काही घटकांना विकत घेतले गेले असल्यासारखी स्थिती आहे. याशिवाय आपले ‘वजन’ वाढवण्यासाठी या मटकावाल्यांनी काही तालमींना देणगीचा रतिब लावला आहे.

त्यामुळे वरवर मोठे झालेले हे मटकावाले कारवाईला घाबरत नाहीत. आज अटक म्हणून त्याचा वृत्तपत्रात फोटो येतो, त्याच सकाळी तो मटकावाला नेहमीप्रमाणे शहरात फिरत असतो. पोलिसांची भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. म्हणूनच त्यांची मिजास वाढली आहे आणि जणू काही हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुन्हेगार असल्यासारखे त्यांना रोखण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांना बैठका घ्यायची वेळ आली आहे. 

तासाभरात मटका बंद शक्‍य
विश्‍वास नांगरे-पाटील यांना मटका बंदच करायचा असेल तर त्यांना केवळ तासाभरात ते शक्‍य आहे. फक्त कारवाई सुरू होईपर्यंत त्यांच्या खबऱ्यापर्यंत यातला एक शब्द जाणार नाही, हे पाहणे गरजेचे आहे. कारण मटकेवाल्यांचे खबरे पोलिसांत नाहीत हे म्हणने धाडसाचे होणार आहे.

Web Title: Matka was closed off