माउलींच्या पालखीचे यंदा जिल्ह्यात चार मुक्‍काम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

वैष्णवांचा सोहळा २४ ते २७ जूनअखेर विसावणार; पहिले उभे रिंगण २५ जूनला 
फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचे या वर्षी सातारा जिल्ह्यात चार मुक्‍काम असून, वारीतील पहिले उभे रिंगण २५ जून रोजी लोणंद ते तरडगाव मार्गावरील चांदोबाचा लिंब येथे दुपारी चार वाजता होणार आहे. या वर्षी २४ ते २७ जून असे चार मुक्‍काम जिल्ह्यात असल्याचे नुकत्याच येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीत ज्ञानेश्‍वर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढ महिन्यात जाणारा वैष्णवांचा मेळा ही खऱ्या अर्थाने फलटण तालुक्‍याला एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक प्रेरणा देणारी वारी म्हणूनच संबोधले जाते. त्यामुळे आषाढी वारीच्या नियोजनासाठी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या प्राथमिक बैठकीमध्ये तरडगाव, फलटण आणि बरड या मुक्‍कामाच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, काही अडचणी याबाबत बैठकीत चर्चा झाली. 

या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक, विश्‍वस्त योगेश देसाई, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालखी सोहळा कालावधीत तिथीचा क्षय असल्याने जिल्ह्यातील पहिला मुक्‍काम म्हणून मान असलेल्या लोणंदमध्ये २४ जून रोजी एकच दिवसाचा मुक्‍काम राहणार आहे. त्यानंतर २५ जून रोजी तरडगाव, २६ जून रोजी फलटण, तर २७ जून रोजी बरड मुक्‍काम झाल्यानंतर सोहळा २८ जूनला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. फलटण येथे पालखीचा मुक्‍काम विमानतळावर राहणार असून, सोहळ्याला पालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य, पाणी याबाबत बैठकीत चर्चा झाली, तसेच पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा आणि दिंडीवाल्यांना रॉकेल व गॅस सिलिंडर पुरवठा याबाबतही चर्चा झाली. 

पालखी तळासाठी २५ एकर जागेचा प्रश्‍न जैसे थे!
पालखी सोहळ्याच्या मुक्‍कामाच्या गावी पालखी तळ उभारण्यासाठी प्रत्येकी २५ एकर जागा मिळविण्याच्या दृष्टीने सुमारे सहा वर्षांपूर्वीपासून सतत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही त्यातून मार्ग निघालेला नाही. तरडगाव येथे मात्र सोहळा गावच्या पूर्वेला असलेल्या प्रशस्त पटांगणावर विसावत असला, तरी दिंड्यांना राहुट्या ठोकण्यासाठी व मुक्‍कामासाठी परिसरातील शेतजमिनीचा वापर करावा लागतो.

Web Title: mauli palkhi 4 stay in satara district