देशात भारी "मॅक्‍स'चा ट्रेनर कोल्हापूरचा...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

मॅक्‍सज्‌ डाएट 
- दररोज अर्धा लिटर दूध आणि उकडलेली अंडी 
- दुपारी व रात्रीच्या जेवणात दररोज पाऊण किलो मटण 
- दररोज अडीचशे ग्रॅम पालेभाज्या, भात आणि ब्रेड 

कोल्हापूर - देशभरातील पोलिस आणि इतर सुरक्षा दलांतील एकशे वीसहून अधिक श्‍वानांवर मात करीत मुंबई पोलिस गोरेगाव डॉग स्क्वॉडच्या "मॅक्‍स'ने सुवर्णपदक पटकावले. म्हैसूर येथे झालेल्या या शोधमोहीम स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केल्याने आता तो सेलिब्रिटी बनला आहे; मात्र कोल्हापूरच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे मॅक्‍सचे ट्रेनर सचिन जाधव हे मूळचे कसबा बावडा- कोल्हापूरचे आहेत आणि मॅक्‍सच्या यशात त्यांचेही योगदान मोलाचे ठरले आहे. 

मॅक्‍स हा साडेचार वर्षांचा लॅब्रॉडॉर जातीचा श्‍वान असून लपवून ठेवलेली स्फोटके कमीत कमी वेळेत शोधून काढण्यात त्याने यश मिळविले. स्फोटके शोधून काढण्याच्या तंत्रामध्ये मॅक्‍स पारंगत आहे. प्रामुख्याने अडगळीच्या खोल्या, विविध साहित्य, वाहने तसेच एखाद्या व्यक्तीच्या अंगावरही स्फोटके असतील तर ते तो तत्काळ शोधून काढतो. 

त्याच्या या खासियतीमुळेच तो स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला. मॅक्‍सचा जन्म पुण्यात झाला. वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून तो मुंबई पोलिसांचा एक घटक बनला आहे. चौथ्या महिन्यापासून त्याला प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. दीड वर्षानंतर त्याला पुण्यातील महाराष्ट्र पोलिसांच्या श्‍वान प्रशिक्षण केंद्रामध्ये भरती करण्यात आले. 2013 मध्ये तो सर्व परीक्षांत उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांत भरती करण्यात आले. तेव्हापासून सचिन जाधव यांच्याकडे मॅक्‍सची जबाबदारी आहे. अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारीही मॅक्‍सवर असते. अखिल भारतीय स्तरावरील शोधमोहीम स्पर्धेसाठी त्याच्याकडून तीन महिने सरावाबरोबरच आहारावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. बीएसएफ, सीआयएसएफ, एनएसजी, आरपीएफ अशा केंद्रीय सुरक्षा दलातील श्‍वानांशी त्याची स्पर्धा होती; मात्र मॅक्‍सने आपले कौशल्य पणाला लावत देशात भारी ठरण्याचा मान मिळवला.

Web Title: Max trainer Sachin Jadhav