जेसीबी, डंपरची कामेही महागली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मायणी - इंधनाची सातत्याने होत असलेली दरवाढ, कामांची अनियमितता, वाढता खर्च यामुळे लाखो रुपये गुंतवून खरेदी केलेली जेसीबी, डंपरसारखी वाहने डोईजड झाली आहेत. कर्जाचे हप्ते व चालकांचे वेतन भागवणेही अनेक मालकांना अशक्‍य होऊ लागले आहे. परिणामी, मायणी व परिसरातील जेसीबी आणि डंपर मालकांनी संघटना तयार करून कामांच्या ताशी दरांत वाढ केली आहे. त्यानुसार जेसीबीला आता ताशी किमान एक हजार रुपये मोजावे लागतील. 

मायणी - इंधनाची सातत्याने होत असलेली दरवाढ, कामांची अनियमितता, वाढता खर्च यामुळे लाखो रुपये गुंतवून खरेदी केलेली जेसीबी, डंपरसारखी वाहने डोईजड झाली आहेत. कर्जाचे हप्ते व चालकांचे वेतन भागवणेही अनेक मालकांना अशक्‍य होऊ लागले आहे. परिणामी, मायणी व परिसरातील जेसीबी आणि डंपर मालकांनी संघटना तयार करून कामांच्या ताशी दरांत वाढ केली आहे. त्यानुसार जेसीबीला आता ताशी किमान एक हजार रुपये मोजावे लागतील. 

येथील तरुणांच्या हाताला काम नाही. पाण्याअभावी शेती पडीक आहे. त्यातच काही तरुणांना वाळू व्यवसायाने साद घातली. काहींनी गाळाचा उपसा व वाहतुकीचा मार्ग पत्करला. अनेकांनी शेती विकासाच्या कामांसह विहीर खोदाई, जलवाहिनी, पाणी योजनांची कामे स्वीकारली. त्यासाठी कर्ज काढून वाहने खरेदी केली. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे मिळणाऱ्या कामांची संख्या कमी झाली. परिणामी, अनेक वाहन मालकांची कुचंबणा झाली. कामांची अनियमितता वाढली. वाढता खर्च, इंधनाचे दररोज वाढणारे दर आदींमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. खरेदी केलेल्या वाहनांच्या कर्जाचे हप्तेही भरणे मुश्‍किल झाले. त्यामुळे जेसीबी, डंपर व ट्रॅक्‍टरसारखी वाहने सांभाळणे, त्यांची देखभाल ठेवणे अशक्‍य होऊ लागले आहे. परिसरात मागणीच्या तुलनेत वाहनांची संख्या अधिक आहे. त्यात भरच पडत आहे.

अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण जेसीबी, डंपर खरेदी करून वाहतूक व्यवसायात येत आहेत. मात्र, कामांअभावी अनेकांना वाहने जागेवरच उभी करून ठेवावी लागत आहेत. 

मायणीसह परिसरात सध्या नऊ जेसीबी, २७ डंपर व दीडशेच्यावर ट्रॅक्‍टरची संख्या आहे. वाहनांच्या खासगी मालकांची संख्या ३६ आहे. त्यांनी एकत्र येऊन जेसीबी, डंपर मालकांची संघटना स्थापन केली आहे. संघटनेच्या पहिल्याच बैठकीत इंधनाचे वाढणारे दर, कामांतील अनियमितपणा, वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च आदी बाबींवर चर्चा झाली.

त्यानुसार जेसीबी व डंपरच्या कामांच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार डंपरचे दर प्रति किलोमीटरला (ये-जा) १०० रुपये करण्यात आला. जेसीबीच्या ताशी दरातही वाढ करण्यात आली. तीन तासांच्या आतील कामासाठी प्रति तास एक हजार रुपये मोजावे लागतील. तीन तासांपेक्षा अधिक कामांसाठी प्रति तास ९०० रुपये आकारले जाणार आहेत. डंपर व ट्रॅक्‍टर भरणीचा दर किमान ३०० रुपये करण्यात आला आहे. संघटनेने निश्‍चित दरांपेक्षा कमी दराने काम करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड करण्याचे ठरले. 

सुधारित दर...
डंपर - १०० रुपये प्रतिकिलोमीटर
जेसीबी - एक हजार रुपये (तीन तासांच्या आत)
जेसीबी - ९०० रुपये (तीन तासांपेक्षा जास्त)
डंपर व ट्रॅक्‍टर भरणी ः ३०० रुपये

Web Title: mayani news satara news jcb dumper work