मायणी पोलिस ठाण्याला हवीय गाडी नवी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

ढकल स्टार्ट गाडी... मोडकळीस आलेली निवासस्थाने... मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे कर्मचारी... अशा विविध समस्यांमुळे येथील दूरक्षेत्रातील पोलिस त्रस्त आहेत. त्याचा दैनंदिन कामकाजावर दुष्परिणाम होत आहे.

मायणी - ढकल स्टार्ट गाडी... मोडकळीस आलेली निवासस्थाने... मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे कर्मचारी... अशा विविध समस्यांमुळे येथील दूरक्षेत्रातील पोलिस त्रस्त आहेत. त्याचा दैनंदिन कामकाजावर दुष्परिणाम होत आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मायणी गावाचा झपाट्याने विस्तार होत आहे. मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेजमुळे राज्यासह परराज्यांतील मुले येथे शिक्षणासाठी येत आहेत. परराज्यातील अनेक लोक येथे कामधंद्यानिमित्त स्थिरावत आहेत. बाजारपेठ विस्तारत असून, व्यवसाय- धंद्यातही वाढ होत आहे. अशी सर्वांगाने गावाची वाढ व विस्तार होत असतानाच येथे बेकायदा धंदे व गुन्हेगारीतही वाढ होत आहे. 

संघटित गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्या, खून, हाणामाऱ्या, लुटालूट आदींत वाढ होत आहे. त्याचे आव्हान पेलताना पोलिसांना नाकीनऊ येत आहे.

परिसरातील कलेढोण, विखळे, पाचवड, चितळी, निमसोड या मोठ्या गावांसह सुमारे २० गावे व वाड्यावस्त्यांची लोकसंख्या सुमारे साठ हजारांच्या घरात आहे. लोकांच्या सुरक्षेची, सामाजिक शांततेची जबाबदारी पेलत असतानाच नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे जिकिरीचे होत आहे. त्यातच घटनास्थळी तातडीने दाखल व्हावे लागते. 

येथून मिरज- भिगवण व मल्हारपेठ- पंढरपूर हे दोन राज्यमार्ग जातात. तीन किलोमीटर अंतरावर सांगली जिल्हा हद्द सुरू होते. गावाच्या पूर्वेला दोन किलोमीटरवर अभयारण्य असून, येथून १७ किलोमीटर अंतरावर पंढरपूर मार्गावर तरसवाडी घाट आहे. उत्तर- पूर्वेला म्हसवड मार्गावर कुक्कुडवाडची खिंड आहे. अनेकदा ते रस्ते निर्जन असतात. त्यामुळे बेकायदा धंद्यांचे ते मीटिंग स्पॉट झाले आहेत. गुन्हेगार भानगडी करून लगेच सांगली जिल्ह्याच्या हद्दीत निघून जातात. मात्र, नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या पोलिस गाडीने नियंत्रणास बाधा येत आहे.शासकीय निवासस्थाने मोडकळीस आल्याने सर्व कर्मचारी खासगी मालकीच्या घरांत राहतात. त्यासाठी दोन ते तीन हजार रुपये जास्त भाडे मोजावे लागते. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

स्वतंत्र पोलिस ठाणे झाल्याशिवाय बेकायदा धंदे व गुन्हेगारीला आळा बसणार नाही.
- दादासाहेब कचरे, माजी उपसरपंच, मायणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayani Police Station Vehicle Issue