थेट सरपंचामुळे सदस्यांचा भाव कमी

संजय जगताप
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मायणी - ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आपल्याच गटाचा सरपंच व्हावा, त्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करून अधिकाधिक सदस्यांना सहलीला नेले जायचे. मनपसंद खाणे, फिरणे, मौजमजा करणे अशी त्यांची मोठी बडदास्त केली जायची. मात्र, नेहमी उसळी मारणारा सदस्यांचा भाव थेट सरपंच निवडीमुळे कमी झाला आहे. या सदस्यांना कोणी विचारेना की फिरायला नेईना. 

मायणी - ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आपल्याच गटाचा सरपंच व्हावा, त्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करून अधिकाधिक सदस्यांना सहलीला नेले जायचे. मनपसंद खाणे, फिरणे, मौजमजा करणे अशी त्यांची मोठी बडदास्त केली जायची. मात्र, नेहमी उसळी मारणारा सदस्यांचा भाव थेट सरपंच निवडीमुळे कमी झाला आहे. या सदस्यांना कोणी विचारेना की फिरायला नेईना. 

राजकीय पटलावर ग्रामपंचायतीच्या सत्तेला अलीकडे खूपच महत्त्व आले आहे. गाव पातळीवरील कोणत्याही विकासकामांसाठी ग्रामपंचायतीच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची आवश्‍कता असते. त्याशिवाय ते कामच होऊ शकत नाही. ग्रामपंचायत विरोधकांच्या ताब्यात असेल तर सहजासहजी ‘ना हरकत’ मिळत नाही. मग अगदी आमदार वा खासदारांनाही तेथे विकासकामे करणे जिकिरीचे होते.

त्यामुळेच कार्यक्षेत्रातील अधिकाधिक ग्रामपंचायतींवर आपलीच सत्ता यावी, असा प्रत्येक नेत्याचा अट्टाहास असतो. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. शासनाच्या नवीन धोरणांमुळे आता ग्रामपंचायतींना थेट लाखोंचा निधी प्राप्त होत आहे. त्यासाठीच ग्रामपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. थेट सरपंच निवडीच्या आधी, पंचायतीत बहुमत आणि सरपंच आपल्याच विचारांचा व्हावा, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात होते. त्यासाठी मग साम, दाम, दंड, भेद अशा सर्व प्रकारच्या नीतींचा वापर केला जात होता. अगदी काठावर बहुमत असेल तर निवडून आलेल्या विरोधी गटातील काही सदस्यांना आमिष दाखवून फोडाफोडी केली जायची. निवडून आलेल्या सदस्यांना भूमिगत केले जायचे. त्यांना सहलींना पाठवले जात होते. त्यांच्या खाणे-पिणे, मनोरंजनाची, पर्यटनाची सोय केली जायची. त्यामुळे सदस्यांचा भाव सेन्सेक्‍सप्रमाणे उसळी मारत होता. 

आता थेट जनतेतून सरपंच निवडीमुळे ग्रामपंचायत सदस्य होण्यात कोणालाही रस वाटत नव्हता. बहुतांश गावांत तर सदस्यांसाठी उमेदवारही मिळत नसल्याची वस्तुस्थिती होती. केवळ नेत्याचा आग्रह व राजकीय गटाची इभ्रत सांभाळण्यासाठी अनेकांनी इच्छा नसताना निवडणुकीच्या रिंगणात उड्या मारल्या. थेट सरपंचामुळे निवडून येऊन सुद्धा सदस्यांना कोणी विचारेना. आधीसारखे कोणी फिरायला नेईना. खाण्यापिण्याची बडदास्त ठेवेना. परिणामी बहुतांशी नवनिर्वाचित सदस्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे.

आता सर्वांच्या नजरा उपसरपंचपदाकडे
थेट जनतेतून सरपंच निवड झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांमध्ये आता उपसरपंचपदाबाबत उत्सुकता दिसते. उपसरपंचपदासाठी होणाऱ्या निवडीकडे सदस्य अपेक्षेने पाहत आहेत. उपसरपंचाच्या शर्यतीत असेलेल्या उमेदवारांकडून काही ऑफर येतेय का, एवढीच आशा त्यांना आता उरली आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे.  

Web Title: mayani satara news direct sarpanch election