पाचपैकी चार नगराध्यक्षपदे राष्ट्रवादीकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

दहिवडी कॉंग्रेसला; वडूजमध्ये अपक्ष बनला उपाध्यक्ष; कोरेगावात कार्यकाल वाटून घेणार

दहिवडी कॉंग्रेसला; वडूजमध्ये अपक्ष बनला उपाध्यक्ष; कोरेगावात कार्यकाल वाटून घेणार
सातारा - जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सहापैकी चार नगरपंचायतींची नगराध्यक्षपदे अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाली आहेत. खंडाळा, वडूज, कोरेगाव आणि पाटण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष झाले असून, दहिवडी नगरपंचायतीत हा मान कॉंग्रेसला मिळाला आहे. वडूज नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. निवडींनंतर ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. मेढा नगरपंचायतीत आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवार निवडून आला नसल्यामुळे नगराध्यक्षपदाची जागा रिक्त राहिली आहे. तेथे आज उपाध्यक्षपदाची निवडही झालेली नाही.

दहिवडी नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान कॉंग्रेसच्या साधना गुंडगे यांना मिळाला. उपाध्यक्षपदी दिलीप जाधव यांची बहुमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या माया खताळ यांना सहा मते मिळाली. साधना गुंडगे यांना कॉंग्रेसची अकरा मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी जाधव यांना अकरा, तर गुंडगे यांना सहा मते मिळाली.

खंडाळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे शरदकुमार दोशी यांची नगराध्यक्षपदी, तर दयानंद खंडागळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादीने अपक्षाला सोबत घेऊन दहा मते मिळवली. विरोधी कॉंग्रेसला सात मते मिळाली. कॉंग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी साजिद मुल्ला, तर उपाध्यक्षपदासाठी दत्तात्रय गाढवे रिंगणात होते.

कोरेगावात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने झेंडा फडकावला असून, पक्षाचे राजाभाऊ बर्गे यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा पहिला मान मिळाला. त्यांना सतरापैकी नऊ मते मिळाली. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच जयवंत पवार यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे राजाभाऊ बर्गे व संजय पिसाळ या दोघांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे पेच निर्माण झाला होता. अखेर राजाभाऊ बर्गे यांना पहिली संधी देण्याचा व ठराविक कार्यकालानंतर पिसाळ यांना हे पद देण्याचा निर्णय झाला. वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. शोभा सचिन माळी यांची बहुमताने निवड झाली. उपाध्यक्षपदी प्रभाग सतरामधील अपक्ष उमेदवार संदीप निवृत्ती गोडसे यांना अनपेक्षितपणे संधी मिळाली.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या सौ. माळी व कॉंग्रेसचे डॉ. महेश गुरव असे दोन अर्ज दाखल झाले होते.

डॉ. गुरव यांना पाच मते मिळाली, सौ. माळी यांना बारा मते मिळाली.
उपाध्यक्षपदासाठी भाजपतर्फे वचन शहा व अपक्ष नगरसेवक संदीप गोडसे यांचे अर्ज दाखल झाले होते. या निवडीत संदीप गोडसे यांना नऊ मते मिळाली. वचन शहा यांना तीन मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडीत कॉंग्रेसच्या सदस्यांनी तटस्थतेची भूमिका घेतली होती.

पाटणमध्ये पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुषमा बाळासाहेब महाजन यांना मिळाला. त्यांनी 14 विरुद्ध एक अशा फरकाने विजय मिळविला. उपाध्यक्षपदी दीपक दत्तात्रय शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचा नगरसेवक तटस्थ राहिला, तर शिवसेनेच्या उमेदवाराला निवडणुकीची प्रक्रिया न समजल्याने स्वत:लाच मतदान करता आले नाही.

पहिल्या नगराध्यक्षपदाचा यांना मान
- दहिवडी - साधना गुंडगे (कॉंग्रेस, नगराध्यक्ष)
दिलीप जाधव (कॉंग्रेस, उपाध्यक्ष)
- खंडाळा - शरदकुमार दोशी (राष्ट्रवादी, नगराध्यक्ष)
दयानंद खंडागळे (राष्ट्रवादी, उपाध्यक्ष)
- कोरेगाव - राजाभाऊ बर्गे (राष्ट्रवादी, नगराध्यक्ष)
जयवंत पवार (राष्ट्रवादी, उपाध्यक्ष)
- वडूज - शोभा माळी (राष्ट्रवादी, नगराध्यक्ष)
संदीप गोडसे (अपक्ष, उपाध्यक्ष)
- पाटण - सुषमा महाजन (राष्ट्रवादी, नगराध्यक्ष)
दीपक शिंदे (राष्ट्रवादी, उपाध्यक्ष)

Web Title: mayor ncp in satara district