कोरोनाचा पहिला रुग्ण इस्लामपुरात सापडला तेव्हा जयंत पाटील कोठे होते?

Mayor Nishikant Patil critisize for jayant patil
Mayor Nishikant Patil critisize for jayant patil

इस्लामपूर (सांगली) : मंत्री जयंत पाटील समर्थकांची इस्लामपुरात सत्ता असताना 31 वर्षात 100 कोटींच्या जवळपास निधी आला. आम्ही गेल्या चार वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुमारे 114 कोटी रुपये आणले, त्यातील 108 कोटींचे प्राप्त अनुदान आहे. मंत्रिमंडळातील आपले वजन वापरून जे साडे 9 कोटींचे अनुदान मंजूर असूनही आम्हाला मिळू दिले नाही ते त्यांनी द्यावेत आणि गेल्या नोव्हेंबरपासून पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे तेही मिळवून द्यावे, असे आव्हान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिले. 

मंत्री पाटील यांनी केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, "मंत्री जयंत पाटील गेल्या तीस वर्षात प्रथमच प्रभागात प्रश्न जाणून घेण्यासाठी जातायत यात आनंद आहे. त्यांच्या सत्ताकाळात कुणी कुणाच्या प्लॉटला कंपाउंड घातले, कुणी व्याजाने पैसे दिले किंवा सावकारीच्या तगाद्याने तरुणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली हे का जाणून घेतले नाही? नगराध्यक्ष सोमवार ते रविवार पूर्णवेळ कार्यरत आहेत आणि हे दर शनिवारी-रविवारी पाहुण्यासारखे येतात. कासेगावच्या कुणी इस्लामपुरात येऊन आम्हाला शिकवण्याची गरज नाही. इथले नगराध्यक्ष आणि नगरसेवक सक्षम आहेत. आम्ही आणलेल्या निधीची त्यांनी त्यांचे नगरविकास राज्यमंत्री असलेल्या भाचाच्या मदतीने तपासणी करावी आणि यल्लम्मा चौकात जाहीर सभा घेऊन लोकांना सांगावे असे आमचे आव्हान आहे. 

सूडबुद्धीने विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची भाषा करायची, मंत्रिपदाचा गैरवापर करणे योग्य आहे का हे त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावे.ते म्हणाले, "मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण इस्लामपुरात सापडला तेव्हा हे कुठे होते? मुंबईतल्या घरात टाळ्या वाजवताना लोकांना ते दिसले. आम्ही 3600 कुटूंबांना घरपोच धान्य दिले. त्यांनी आणलेल्या निधीतून झालेल्या रस्त्यांची गुणवत्ता तपासावी. कोरोनाकाळात एक रुपयाही दिला नाही. 

31 वर्षात आमदार फंडातील किती रक्कम खर्च केली? प्रभाग बैठकीतील सभांना तेच तेच चेहरे कसे? याचे उत्तर द्यावे. शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना राखेच्या प्रदूषणाचा त्रास होतोय, कारखान्याच्या मळीमुळे जमिनी खराब झालेत.कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली असताना सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना कोण अडवत आहे? शहरासाठी आलेल्या निधीला स्थगिती कुणी दिली? असे असताना मंत्री असणारे हे धादांत खोटे कसे काय बोलू शकतात हा प्रश्न आहे. 

राजारामबापूंनी उभारलेल्या संस्थांमध्ये यांची कर्तबगारी शून्य आहे. बापूंनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. अण्णासाहेब डांगे, विलासराव शिंदे आणि एन. डी. पाटील यांचे कारखाने होऊ दिले नाहीत आणि संभाजी पवारांच्या सर्वोदयचा ताबा कसा घेतला हे जनतेला माहीत आहे."यावेळी प्रसाद पाटील, धैर्यशील मोरे, संदीप सावंत, मधुकर हुबाले, विकास पाटील, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com