नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांची आज प्रतीक्षापूर्ती

नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांची आज प्रतीक्षापूर्ती

मुंबईत आरक्षण सोडत; पालिकेत नेते कोणाला संधी देणार याची उत्सुकता

सातारा - आता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असून उद्या (बुधवारी) मुंबईत नगराध्यक्ष आरक्षणांची सोडत निघणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही पालिकांच्या शहरांत नगराध्यक्ष कोण होणार व कोणाला संधी मिळणार, यासाठी असंख्य इच्छुकांच्या प्रतीक्षेला यानिमित्ताने पूर्णविराम मिळणार आहे. पालिकेची सत्ता हाती राखून असलेल्या आघाड्यांचे नेते कोणाला संधी देतात, याकडे लक्ष लागले 
आहे. 

साताऱ्यात दोन्ही राजांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. मनोमिलनाच्या अखंडतेबाबत उलट-सुलट चर्चा असली तरी ते तुटण्यासारखे ठोस कारण सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनोमीलन कायम राहण्याची शक्‍यता अधिक दिसते. तसे झाल्यास दोन्ही आघाड्यांच्या संमतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरेल. भाजप, शिवसेना, मनसे आदी पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचे जाहीर केले असले तरी त्यांना प्रभागांत उमेदवार उभे करताना फेस येणार आहे. भाजप कोणत्याही आघाडीच्या वळचणीला उभा राहिला नाही, तर नगराध्यक्षपदाची लढत रंगतदार होऊ शकते. अर्थात उद्याचे आरक्षण कोणते निघते, यावर सर्वकाही अवलंबून आहे. 

वाईत इच्छुक जास्त 
आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाईमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे पालिकेची सत्ता आहे. नगराध्यक्षपद खुले राहिल्यास सत्तारूढ आघाडीकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याने उमेदवार निवडताना नेतृत्वाचा कस लागणार आहे. विरोधी ‘जनकल्याण’मधूनही काही इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, उद्याचे आरक्षण काय पडते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. 

कऱ्हाडला आशा पल्लवित
नगराध्यक्षपदाच्या फेरआरक्षणामुळे कऱ्हाडमध्ये खुल्या प्रवर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कऱ्हाडचे नगराध्यक्षपद गेली १६ वर्षे विविध प्रवर्गासाठी आरक्षित राहिले. यावेळी संधी मिळेल, अशी खुल्या गटातील इच्छुकांना आशा आहे. 

महाबळेश्‍वरात धक्का
आठ नगरसेवक अपात्र ठरल्याने महाबळेश्‍वरमधील पर्यटन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या आघाडीत एकसूत्रतेचा अभाव आहे. डी. एम. बावळेकर यांची लोकमित्र जनसेवा आघाडी फ्रंटफुटवर आली आहे. अर्थात निवडणुकीपर्यंत या वातावरणात काय बदल होताहेत, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

पाचगणीत देव पाण्यात
पाचगणीत काहींनी आरक्षण आपल्याच बाजूने पडावे यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. प्रभाग निश्‍चितीनंतर काहींनी आपले प्रभाग फिक्‍स केले.

परंतु, नगराध्यक्षपदासाठीच्या आरक्षणासाठी कुणीही उमेदवारी जाहीर करण्यास धजावेना. प्रस्थापितांनी आरक्षण आपल्यासाठी सुकर पडले नाही तर प्रभागातच नगरसवेकपदासाठी लढण्याची तयारी केली आहे.

आठही शहरांत उत्सुकता 
उद्याच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत कुणाला लॉटरी लागणार, कुणाला बोनस मिळणार आणि कुणाची स्वप्न भंगणार, याची उत्सुकता आठही शहरांत दिसून येते. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक सोपी नसली तरी आठही शहरांत खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची संख्या सर्वाधिक दिसत आहे.

थेट नगराध्यक्ष निवडणुकीवर शिक्कामोर्तब 
गेल्या अनेक महिन्यांपासून नगराध्यक्ष निवड ही नगरसेवकांतून की जनतेतून, याबाबत संभ्रम होता. नगरविकास विभागाने मंत्रालयात उद्या (बुधवार) नगराध्यक्ष आरक्षणाच्या सोडतीसाठी मुहूर्त निवडला. त्यामुळे थेट निवडणुकीवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले आहे. अनेकांचे राजकीय भवितव्य बुधवारी ठरणार आहे. ‘मिनी आमदारकी’ कुणाच्या पदरात पडणार, कुठले आरक्षण निघणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. हे आरक्षण पाच वर्षांसाठी असणार असल्याने सर्वांच्या नजरा उद्याच्या सोडतीकडे लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com