मेडिकल कॉलेज माईल स्टोन ठरणार 

विशाल पाटील
शनिवार, 20 मे 2017

पाच वर्षांपासून रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी "रामबाण' उत्तर दिले. कृष्णा खोरे महामंडळांची जमिनी वैद्यकीय शिक्षण खात्याकडे वर्ग करण्याचा विषय अंतिम टप्प्यात असून, तो एक महिन्यात पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जिल्ह्याच्या "हेल्थ व्हिजन'मध्ये हे मेडिकल कॉलेज "माइल स्टोन' ठरेल. 

पाच वर्षांपासून रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी "रामबाण' उत्तर दिले. कृष्णा खोरे महामंडळांची जमिनी वैद्यकीय शिक्षण खात्याकडे वर्ग करण्याचा विषय अंतिम टप्प्यात असून, तो एक महिन्यात पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जिल्ह्याच्या "हेल्थ व्हिजन'मध्ये हे मेडिकल कॉलेज "माइल स्टोन' ठरेल. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या काळात साताऱ्यासह राज्यात काही ठिकाणी मेडिकल कॉलेजची घोषणा झाली. सातारा वगळता बहुतेक महाविद्यालये सुरूही झाली. मात्र, मुख्यमंत्री व जलसंपदामंत्रिपद साताऱ्याकडे असतानाही तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रश्‍न सुटला नाही. मेडिकल कॉलेजसाठी तब्बल 1200 कोटींचा निधी मंजूर असतानाही जागेत घोंगडे अडकले. कृष्णानगर येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन वैद्यकीय शिक्षण खात्याकडे वर्ग करण्याच्या मुद्‌द्‌यावर घोडे पेंड खात होते. दोन्हीही खाती शासकीय असतानाही जमीन हस्तांतरांसाठी "बाजारभाव' पुढे केले जात होता. जागेची रक्‍कम सुमारे 52 कोटी, तर त्या जागेतील इमारत बांधून देण्याचा खर्च ही बाब कळीची ठरली. त्यामुळेच तब्बल पाच वर्षांहून अधिक हा प्रश्‍न रखडला गेला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रश्‍न पुढे आला. "सकाळ'ने हा मुद्दा महत्त्वाचा केला. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेतली. "मेडिकल कॉलेजची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, जागेचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठविला आहे. त्यास एक महिन्याच्या आत मंजुरी मिळेल,' असे सांगून त्यांनी सातारकरांना दिलासा दिला. 

जागा वर्ग झाल्यानंतर या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. सध्याचे जिल्हा रुग्णालय हे पब्लिक हेल्थ डिर्माटमेंटचे असून, कॉलेज सुरू होताना ते वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग केले जाईल. पुढे कृष्णानगर येथे मेडिकल कॉलेजची इमारती उभी राहील. सध्याचे 200 बेड आणि नवीन 500 बेड असे 700 बेडचे एकंदरीत हॉस्पिटल उभे राहील. प्राथमिक टप्प्यात मेडिकल कॉलेजसाठी इमारत उभी केली जाईल. पहिल्या दोन वर्षांत तेथे मेडिकल कॉलेज सुरू राहील. त्यासाठी सध्याचे जिल्हा रुग्णालयाचा उपयोग केला जाईल. पुढील कालावधीत हॉस्पिटलसाठी इमारत उभी केली जाईल. हे काम अंतिम टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारेंसह लोकप्रतिनिधी, अधिकारी, जनतेला सातत्याने पाठपुरावा करावा लागेल. 

मुद्‌गल, डॉ. जगदाळेंचा पाठपुरावा 
पूर्वाश्रमीचे जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल हे मुख्यमंत्र्यांच्या नागपूर महापालिकेत आयुक्‍त आहेत, तर पूर्वाश्रमीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे हे सध्या नाशिक येथे कार्यरत आहेत. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडे डॉ. जगदाळेंनी हा प्रश्‍न मांडला आहे. श्री. मुद्‌गल यांची सातत्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते. या दोघांचा साताऱ्याची कायमचा ऋणानुबंध असल्याने तेही नक्‍की याचा पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा आहे. 

...हे होतील फायदे 
- सर्वसामान्यांसाठी भव्य हॉस्पिटल 
- अत्याधुनिक उपकरणे 
- तज्ज्ञ, निवासी डॉक्‍टर 
- तब्बल 150 डॉक्‍टर वर्ग 
- आरोग्य सेवाचा दर्जा वाढणार 

Web Title: Medical College will be Mile Stone