वाडा पंचायत समितीच्या उपसभापती पदी मेघना पाटील यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

वाडा - वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ पाटील यांचा उपसभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज झालेल्या उपसभापती निवडणुकीत भाजपच्या युवा कार्यकर्त्या मेघना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोषात स्वागत केले.  

वाडा - वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ पाटील यांचा उपसभापती पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज झालेल्या उपसभापती निवडणुकीत भाजपच्या युवा कार्यकर्त्या मेघना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने जल्लोषात स्वागत केले.  

वाडा पंचायत समितीची सदस्य संख्या 12 होती. मात्र वाडा नगर पंचायत झाल्याने वाडा गणाचे सदस्य रद्द झाले. त्यामुळे एकूण 11 सदस्य आहेत. त्यापैकी सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपाने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी  काँग्रेसशी समजोता केला आहे. प्रत्येक सदस्याला संधी मिळावी असे ठरल्याप्रमाणे भाजपाचे अरूण गौंड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणाली नडगे यांनी सभापती पदाचा अनुक्रमे दीड व एक वर्षाचा तर नंदकुमार पाटील, माधुरी पाटील, जगन्नाथ पाटील यांनी उपसभापती पद यापूर्वी भुषविले आहे. तर अश्विनी शेळके या  सभापती पदी कार्यरत आहेत. 

बुधवारी (दि 17) उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. यात भाजप कडून उपसभापती पदासाठी मेघना पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांनी काम पाहिले.  

नवनिर्वाचित उपसभापती यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले, माजी उपसभापती व विद्यमान सदस्य नंदकुमार पाटील, भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, जि.प.सदस्य सुवर्णा पडवले, युवा कार्यकर्ते मंगेश पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस कुणाल साळवी, विभागीय सरचिटणीस दिनेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते पांडुरंग पटारे, तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, मिडीया सेलचे जयेशशेलार, दशरथ पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.  

मेघना पाटील या चिंचघर गणातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे या गणात आज उत्साहाचे वातावरण होते. पाटील यांच्या निवडीचे वृत्त येताच कुडूस नाक्यासह संपूर्ण गणात जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 

दरम्यान, वाडा पंचायत समितीत शिवसेनेचे पाच सदस्य असताना सुद्धा शिवसेनेने उपसभापती पदासाठी अर्जही न भरल्याने तसेच आज झालेल्या विशेष सभेत उपस्थितही न राहिल्याने शिवसेनेने सपशेल हार मानल्याची चर्चा वाड्याच्या राजकारणात रंगली आहे.

Web Title: Meghna Patil as the Vice-Chairman of Wada Panchayat Samiti