सदस्य भर सभेत अधिकाऱ्याच्या पायावर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

महापालिकेने 17 हजार वृक्ष लावल्याचा दावा उद्यान विभागप्रमुख उद्धव म्हसे यांनी स्थायी समितीच्या सभेत केला. त्यांना नगरसेवक गणेश भोसले यांनी "हे वृक्ष कोठे लावले,' असे विचारले असता, म्हसे वृक्षवाटपाचीच आकडेवारी सांगू लागले. त्यामुळे वैतागून भोसले भर सभेत चक्‍क म्हसे यांच्या पाया पडले. 

नगर : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेत महापालिका प्रशासनाला 22 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेने 17 हजार वृक्ष लावल्याचा दावा उद्यान विभागप्रमुख उद्धव म्हसे यांनी स्थायी समितीच्या सभेत केला. त्यांना नगरसेवक गणेश भोसले यांनी "हे वृक्ष कोठे लावले,' असे विचारले असता, म्हसे वृक्षवाटपाचीच आकडेवारी सांगू लागले. त्यामुळे वैतागून भोसले भर सभेत चक्‍क म्हसे यांच्या पाया पडले. 

महापालिकेत आज दुपारी स्थायी समितीची सभा होती. यात सिद्धिबाग व महालक्ष्मी उद्यानाच्या खासगीकरण व सात उद्यानांचा ना नफा न तोटा या तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विषय मांडण्यात आला होता. या वेळी स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख व कुमार वाकळे यांनी गंगा उद्यानाच्या खासगीकरणाच्या निविदेची मुदत संपून दोन वर्षे झाल्याचे सांगितले. तसेच ई-निविदा प्रक्रिया का राबविली नाही, याची विचारणा केली. भोसले यांनी अमृत योजनेतून शहरातील 13 उद्यानांचे काम करण्यासाठी एक वर्षांची निविदा काढलेली असताना त्यातील पाच उद्यानांचा ना नफा ना तोटा तत्त्वावरील उद्यानांत समावेश करण्यात आल्याचे उघड केले. तसेच उद्यान विभाग झोपेत कामे करतो का, असा सवाल केला.

उद्यान विभागाच्या कामाची झाडाझडती

उद्यान विभागाच्या कामाची झाडाझडती घेण्यासाठी त्यांनी वृक्षलागवडीची माहिती विचारली. 
महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरात 17 हजार झाडे लावल्याचा दावा म्हसे यांनी केला. स्थायी समितीच्या बैठकीत ही वृक्षलागवड कशी केली, याची तपासणी केल्यावर चांगलाच गोंधळ झाला. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी उत्तरे दिली, ती ऐकून सदस्य आणि अधिकारी अवाक्‌ झाले. वृक्षलागवडीच्या जागी वृक्षवाटपांचीच माहिती अधिकारी देऊ लागल्याने वैतागलेल्या गणेश भोसले यांनी खुर्चीवरून उठून उद्धव म्हसे यांचे पाय धरले.

वृक्षलागवडीची माहिती मागितली.  

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अजब कारभाराविषयी त्यांनी संताप व्यक्त केला. 
महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेत महापालिकेला 22 हजार लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद होती. शहरातील काही भागात वृक्षलागवडीसाठी खड्डे घेण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात तेथे वृक्षलागवड झालेली नाही. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारींना उद्यान विभाग अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. स्थायी समितीच्या सदस्यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तपासणी केली असता, त्याला समर्पक उत्तरे देता आली नाहीत. शेवटी भोसले यांनी महापालिका उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे वृक्षलागवडीची लिखित माहिती मागितली.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Member emphasis at the feet of the officer in the meeting!