जागतिक पुरुष दिन : पुरुषांचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय! कारण..

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- कुटुंबाला वेळ द्या; आपल्या समस्येविषयी बोला
- मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला
- पुरुषांना दारू, सिगारेट यासह इतर व्यसन

सोलापूर : आत्महत्यांच्या घटनांत पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. जगण्याच्या धावपळीत मानसिक संतुलन बिघडत असल्यामुळे हे प्रमाण वाढत आहे. पुरुष मानसिकदृष्ट्या खंबीर झाले तर वाईट गोष्टी आणि आत्महत्या टळू शकतील, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

संवाद कमी झाला आहे
जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने "सकाळ'ने आत्महत्या आणि वाईट विचार करणाऱ्या पुरुषांच्या समस्येबाबत मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला. कुटुंबातील कर्ता म्हणून पुरुषांवर जास्त जबाबदारी असते. नोकरी, व्यवसाय, कुटुंबाची जबाबदारी यामुळे पुरुषांवर जास्त ताण असतो. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील सदस्यांना कर्त्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा असतात. पुरुषांना आपल्या स्वत:च्या मानसिक समस्या कुटुंबातील सदस्यांना बोलून दाखवणे कमीपणाचे वाटते. आपली अडचण ते कोणालाही सांगत नाहीत. अनेक पुरुष वैवाहिक अडचणीमुळे मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. तसेच नोकरी, व्यवसायामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ न देता आल्याने संवाद कमी झाला आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. 

हेही वाचा - हनीमूनसाठी पती वाट पाहत असताना पत्नी...

पुरुषांना दारू, सिगारेट यासह इतर व्यसन
मानसिक तणावातून अनेक पुरुषांना दारू, सिगारेट यासह इतर व्यसन लागल्याचेही दिसून येते. आपल्या नैराश्‍येविषयी बोलण्यास अनेकजण घाबरतात. यातूनच मग पुढे आत्महत्येचे विचार वाढत जातात. आपल्या समस्येविषयी कोणाशी बोलावे हे अनेकदा कळत नाही. अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची भीती वाटते. पुरुषांनीच घर चालवावे ही मानसिकताही याला कारणीभूत आहे. पुरुषांसाठी स्वतः मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. सोलापुरात पुरुषांच्या आत्महत्येचे कारण बेरोजगारी असल्याचे दिसून आले आहे, असे डॉ. नितीन भोगे यांनी सांगितले. 

हेही वाचा - रोजच मरताहेत वटवाघळं! कारण..

हे आहेत उपाय : 
- कुटुंबाला वेळ द्या, सुटीच्या दिवशी फिरायला जा. 
- नकारात्मक विचारांपासून दर रहा. 
- आनंद देणाऱ्या गोष्टी करा. 
- मित्र, नातेवाइकांसोबत गप्पा मारा. 
- आपली अडचण, समस्या बोलून दाखवा. 
- शक्‍य असल्यास जबाबदारीचे योग्य नियोजन करा. 

मानसोपचार तज्ञ म्हणतात..
शारीरिक आरोग्याबद्दल अनेकजण जागृत असतात पण मनाच्या आरोग्याविषयी अनास्था असते. ताणतणाव, नियोजनाचा अभाव दिसून येतो. ज्याप्रमाणे आपण पाय फ्रॅक्‍चर झाल्यावर अस्थिरोग तज्ज्ञाकडे जातो तसेच मन तुटल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार, सल्ला घ्यायलाच हवा. वेळीच मानसिक आधार आणि उपचार घेतल्यास आत्महत्येसारख्या वाईट विचारांपासून आपण दूर जाऊ शकतो. 
- डॉ. नितीन भोगे, 
मानसोपचार तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men's mental balance is deteriorating! Reason ..