आता ‘एसएमएस’द्वारे कळेल मीटर रीडिंग

Meter-Reading
Meter-Reading

सातारा - वीज बिलावर मीटर रीडिंगचे छायाचित्र छापणे बंद करण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. या महिन्यापासून वीज बिलावर मीटर रीडिंगचा फोटो नसला तरी, रीडिंग घेतल्यानंतर त्याची माहिती ग्राहकाला ‘एसएमएस’च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना आपला मोबाईल ‘महावितरण’कडे नोंदवावा लागणार आहे.

वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रीडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात ‘महावितरण’ने सर्वप्रथम वीज बिलावर मीटर रीडिंगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. बिल तयार झाल्यानंतर ग्राहकांना मीटरच्या रीडिंगचा फोटो उपलब्ध होत होता. त्यामुळे रीडिंगची खात्री करून घेता येत होती. या निर्णयाचा ग्राहकांना फायदाही होत होता. परंतु, आता ‘महावितरण’ वीज बिलावर रीडिंगचा फोटो छापणे बंद करणार आहे. ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, त्यांना ‘महावितरण’संबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती ‘एसएमएस’द्वारे दिली जाते. आता रीडिंगची माहितीही ‘एसएमएस’च्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीटर रीडिंग घेतल्यावर लगेचच त्याबाबतचा मेसेज संबंधित ग्राहकाला जाणार आहे. त्यामुळे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच मीटर रीडिंगची माहिती मिळणार आहे. त्यानुसार ग्राहकांना आपले मीटर रीडिंग पडताळणीसाठी उपलब्ध होणार आहे. मीटर रीडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्‍य होणार आहे.

...असा नोंदवा क्रमांक 
‘महावितरण’च्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ’एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून ’एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. त्याशिवाय कॉल सेंटरच्या १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

संकेतस्थळावर पाहता येणार फोटो
फोटो मीटर रीडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com