म्हैसाळ कालव्यातील पंप काढून टाकणार 

म्हैसाळ कालव्यातील पंप काढून टाकणार 

मिरज - म्हैसाळ प्रकल्पाच्या कालव्यांतून पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे; त्यामुळे जत तालुक्‍याला पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्व पंप काढून टाकण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व शाखा अभियंत्यांची बैठक आज वारणाली कार्यालयात झाली. शेतकऱ्यांनी स्वतःहून पंप काढून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून म्हैसाळ प्रकल्पातून पाणी उपसा सुरू आहे. मिरजसह तासगाव, कवठेमहांकाळ व जत तालुक्‍याला पाणीपुरवठा सुरू आहे. गेले सत्तर दिवस कालव्यातून अखंड पाणी वाहते आहे. मिरज आणि कवठेमहांकाळ भागात उपसा जोरात असल्याने जतला पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. एप्रिल सुरू झाला तरी जत तालुक्‍याच्या अनेक भागांत पाणी पोचलेले नाही. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्याने आज वरिष्ठ स्तरावर बैठक झाली. 

जत वगळता अन्य तालुक्‍यांत बहुतांश लाभार्थी क्षेत्राला पाणी मिळाले आहे. आता जतवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरले. मुख्य कालव्यातून मोठ्या क्षमतेने पाणी पुढे सरकण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी गरजेनुसार पंपांची संख्या वाढवण्यात येणार आहे; शिवाय कालव्यांवर शेतकऱ्यांनी बसवलेले पंप हटवण्याचाही निर्णय झाला. बेडग, आरग, कळंबी, सलगरे आणि कवठेमहांकाळ कालव्यांवर सुमारे साडेतीनशेंहून अधिक शेतकऱ्यांचे पंप सध्या उपसा करीत आहेत. विहिरी, शेततळी आणि कूपनलिका भरून घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी तब्बल तीन-चार किलोमीटरपर्यंत पाइपलाइन टाकून पाणी नेले आहे. जतला पाणी पोहोचवण्यासाठी सर्व पंप हटवण्याचे ठरले. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांनी स्वतःहून पंप काढून घ्यावेत, असे आवाहन श्री. नलवडे यांनी केले आहे; अन्यथा प्रशासन ते काढून टाकेल, असा इशारा दिला. मुख्य कालवा व शाखा कालव्यांतून पाणीपुरवठा मात्र सुरूच राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com