म्हसव्यातील स्फोटास वन विभाग जबाबदार

Forest-Department
Forest-Department

हुमगाव - वडाचे म्हसवे हद्दीतील जंगलात काल गावठी बाँबचा स्फोट होऊन एक मजूर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र, तेथे बाँब कोणी, कशासाठी पूरला, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. वन विभागाचे वनरक्षक गस्त घालत असते तर या जंगलात बाँब पुरण्याचे कोणाचेच धाडस झाले नसते, हेही सत्य आहे. त्यामुळे याला प्रथमदर्शनी वन विभाग जबाबदार आहे, अस म्हटले तर वावगे ठरणार नाही.

वडाचे म्हसव्यात जानेवारीत प्रज्वल गायकवाड या शाळकरी मुलाचा वडाची फांदी डोक्‍यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर काल वनव्याप्त क्षेत्रात रानटी डुक्कर मारण्यासाठी पुरलेल्या गावठी बाँबचा स्फोट होऊन दादासाहेब चव्हाण हे जखमी झाले. मुळात वनव्याप्त क्षेत्रात वनमजूर नेमणुकीस असूनही गावठी बाँब पुरलेला माहिती कसा होत नाही? दरवर्षी जानेवारी महिन्यात परप्रांतीय लोक डोंगराच्या जंगलातून रानटी डुक्करांच्या शिकारी करण्यासाठी अशा प्रकारचे बाँब जंगलात ठेवतात. शिकारीनंतर त्या मांसाची राजरोसपणे गावांमध्ये विक्री करतात. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक हे नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवाल जावळीकरांमधून उपस्थित केला जात आहे.

जावळीतील वन विभाग एका बाजूने डोंगरमाथ्यावरील गावांचे रस्ते अडवून ग्रामस्थांची अडवणूक करताना दिसतो, तर दुसऱ्या बाजूने तालुक्‍यातील डोंगरउतारावरील गावांमध्ये रानडुक्कर, वानर, तरस अशा वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. तालुक्‍यातील वन अधिकाऱ्यांचे केवळ कास पुष्प पठारावरच लक्ष अधिक असल्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वन विभागाकडून आतापर्यंत कधीच न्याय मिळाला नाही.

वन विभाग बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्यामुळेच तालुक्‍यामध्ये रानडुकरे मारणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. अशा टोळ्यांकडून गावठी बाँबचा सर्रास वापर होतो. या टोळ्यांवर वन विभागाचा वचक नाही, अन्यथा कालची दुर्दैवी घटना घडली नसती. महत्त्वाचे म्हणजे जंगल परिसरात गावठी बाँब फुटला तरीदेखील वनपरिक्षेत्र अधिकारी तेथे फिरकले नाहीत. घडलेली घटना ही केवळ वन विभागाचे अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच घडली असून, वन विभागाने घटनेची जबाबदारी स्वीकारून तत्काळ जखमी चव्हाण यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जावळीकर जनतेतून होत आहे.

अधिकारी बैठकीस, वनपाल, वनरक्षक भागात! 
वन विभागाच्या मेढा कार्यालयात गेले असता वनपरिक्षेत्र अधिकारी बैठकीला तर वनपाल-वनरक्षक हे भागात गस्त घालत असल्याचे सर्रास उत्तर मिळते. मात्र, अशा दुर्दैवी घटना वनव्याप्त क्षेत्रात घडल्यावर वन अधिकारी, वनपाल, वनरक्षक नेमके करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com