प्रसंगी मुंबईचा दूध पुरवठा १६ पासून रोखणार - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

कोल्हापूर - शासनाने दूध दरासाठी हमीभाव जाहीर केला. याला दूध संघ किंवा कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट गाईच्या दुधाचा दर आणखी दोन रुपये कमी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान वर्ग करावे; अन्यथा १६ जुलैपासून मुंबईला थेंबभरही दुधाचा पुरवठा होऊ देणार नाही. , असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दूध संघ व कंपन्यांनी हा इशारा ओळखून दूध पुरवठा थांबवला नाही तर मात्र कायदा हातात घेऊन आंदोलन केले जाईल.
ते म्हणाले, ‘‘दूध दरातील घसरणीमुळे शेतकरी तोट्यात आले आहेत. सरकारला १६ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्या दरम्यान निर्णय न झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक जिल्ह्यांतून दुधाचा एक थेंबही मुंबईकडे जाणार नाही. कर्नाटकप्रमाणे गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी आपली मागणी आहे. त्याचा विचार न झाल्यास १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा बंद केला जाईल. 

पुण्यात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कैफियत मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावरूनच सरकारने इशारा लक्षात घेतला पाहिजे. शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना दिलेली आश्‍वासने तत्काळ पूर्ण केली पाहिजे.’’  यावेळी प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, सावकर मादनाईक उपस्थित होते. 

दूध संघांनी सहभागी व्हावे!
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि डेन्मार्कमध्येही असेच संकट आले आहे. तेथील शेतकऱ्यांनी गाई कत्तलखान्याकडे पाठवल्या. येथे तेही करता येत नाही. सरकारने जादा झालेली दूध पावडर खरेदी व बफर स्टॉक केला पाहिजे. मात्र असे प्रयत्न होत नाहीत. शेतकऱ्यांच्या लढ्यात दूध संघांनीही सहभागी व्हावे, आडवे येऊ नये. शुक्रवारी (ता. ६) कोल्हापुरात दूध उत्पादकांचा मेळावा घेणार असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

‘‘दुधाला दर मिळाला पाहिजे, अशी मागणी होत असताना दुधाचे दर कमी केले जात आहे. हे चुकीचे आहे.’’
- राजू शेट्टी, खासदार

Web Title: Milk Rate Mumbai Milk Supply Stop Raju Shetty