सुवर्णाताई दुचाकीवरुन घालताहेत दुधाचा वरवा

परशुराम कोकणे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

- आधुनिक गवळणीचा कष्टाच्या जोरावर दुधाचा व्यवसाय 
- 10 वर्षापासून दुचाकीवरुन घालताहेत दुध 
- सुवर्णाताईचे नववीपर्यंत शिक्षण 

सोलापूर : डोक्‍यावर हंडा घेऊन दुधाची, दह्याची विक्री करणारी गवळण आपण पाहिली असेलच.. पण दुचाकीला कॅंड अडकावून आपल्या ग्राहकांना दुधाचा वरवा घालणारी आधुनिक गवळण तुम्ही पाहिली आहे का? सोलापुरातल्या सत्तर फूट रोड परिसरात राहणाऱ्या सुवर्णा सिद्धू बहिरवाडे या गेल्या 10 वर्षांपासून धाडसाने दुचाकीवरून घरोघरी जाऊन दूध विक्री करत आहेत. सुवर्णाताईंच्या कष्टाची ही कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. 

सोलापूर एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे नगरसेवकपद रद्द

मूळच्या बार्शीच्या असलेल्या सुवर्णाताईंचे शिक्षण साधना कन्या प्रशालेत नववीपर्यंत झाले आहे. लग्नानंतर त्या सोलापुरात आल्या. कामाला न लाजणाऱ्या सुवर्णाताईंनी आपल्या सासू-सासऱ्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय पती आणि मुलांच्या मदतीने वाढविण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या 10 वर्षांपासून दररोज जवळपास 10 किलोमीटर दुचाकीवर जाऊन सुवर्णाताई दुधाचा वरवा घालत आहेत. अशोक चौक, कुमठा नाका, सत्तर फूट रोड, स्वागतनगर या परिसरात त्यांचे ग्राहक आहेत. सकाळी लवकर उठून, आवरून सात वाजता त्या दूध घेऊन घराबाहेर पडतात. साडेआठ वाजता घरी परत येतात. स्वयंपाक, जनावरांची, गोठ्याची स्वच्छता यात त्या व्यस्त असतात. दुपारी पुन्हा चार ते सहा यावेळेत दुधाचा वरवा असतो. मुलगा शुभम हाही आईला मदत करतो. आज सुवर्णाताईंकडे 15 म्हशी, एक गाय, बैल अशी जनावरे आहेत. दररोज जवळपास 80 ते 100 लिटर दुधाची विक्री होत आहे. 

अन आईने फोडला हंबरडा...

कष्टाळू पती सिद्धू बहिरवाडे यांनीही पत्नी सुवर्णा यांना प्रोत्साहन दिले. श्री. बहिरवाडे हे स्वत: दिवसभर देगाव परिसरात जनावरांसाठी वैरण आणायला जातात. माझ्यापेक्षा त्यांचं काम जास्त कष्टाचं आहे, असे सुवर्णाताई आवर्जून सांगतात. दोघांनी कष्ट करून जुन्या घराशेजारीच दुसरी जागाही त्यांनी घेतली आहे. मुलांनाही चांगले शिक्षण दिले आहे. कॉलेजला जाणारी मुलगी अश्‍विनी हीसुद्धा कधी-कधी सायकलवरून दुधाचा वरवा घालायला जाते. पतीसह मुलांनाही सुवर्णाताईंचा अभिमान आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी संख्या घटतेय

सुवर्णाताई म्हणतात, ""कामासाठी लाजायचं कशाला? कष्ट करून जगण्यात वेगळाच आनंद आहे. दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने स्पर्धेच्या युगातही आमचे ग्राहक टिकून आहेत. एका वेळेला दुचाकीला 30 लिटर दूध मी घेऊन जाते. सुटी घेतल्याने व्यवसायावर परिणाम होतो, त्यामुळे मी कधीच सुटी घेत नाही. परगावी नातेवाइकांचे लग्न किंवा अन्य काही कार्यक्रम असेल तर घरातल्या सदस्यांनाच पाठवून देते. शहरात जर कोणाचे कार्यक्रम असतील तर मी सायंकाळनंतर वेळ काढून जाते. जनावरांची देखभाल, गोठ्याची स्वच्छता, स्वयंपाक आणि दूध वाटप यात दिवस कसा जातो, हेच कळत नाही.'' 

-
बाहेर दोन-चारशे रुपयांवर कामाला जाण्यापेक्षा परंपरागत असलेला दूध विक्रीचा व्यवसाय वाढविण्यासाठी मी प्रयत्न केले. रोज जवळपास 100 लिटर दुधाची विक्री आम्ही करतो. स्पर्धेच्या युगातही गुणवत्तापूर्ण दुधामुळे आमचे ग्राहक टिकून आहेत. कुटुंबीयांच्या मदतीमुळे हे सारं शक्‍य झालं. दुचाकीवरून दूध वाटपाला जाताना रस्त्यावरील लोक आश्‍चर्याने पाहतात. अनेकजण थांबून कौतुक करतात. प्रोत्साहन देतात. कष्टामुळे आज आमचा संसार आनंदात सुरू आहे. 
- सुवर्णा बहिरवाडे, 
आधुनिक गवळण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk supplyer women... suvrnatai