#MilkAgitation राज्यात दोन दिवसात पावणेदोन लाख लिटर दुधाची वाहतूक ठप्प

तात्या लांडगे
मंगळवार, 17 जुलै 2018

राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ग्राहकांना दुधाचा तुटवडा जाणवू नये यासाठी सुमारे 80 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसापर्यंत तो पुरेल. तसेच, राज्यातील विविध ठिकाणांहून पोलिस बंदोबस्तात दूध शहरांमध्ये आणले जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना दुधाचा पुरवठा करणे शक्‍य असल्याचे दुग्ध विभागाकडून सांगण्यात आले.

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाचा परिणाम राज्यात जाणवू लागला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसांपर्यंत दररोजच्या एकूण 1 कोटी 30 लाख लिटर दुधाच्या संकलनापैकी सोमवारी फक्‍त 40 लाख लिटरच संकलन झाल्याची माहिती राज्याच्या दुग्ध विभाग कार्यालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

राज्यभरात संपाची तीव्रता कायम असून मंगळवारी परराज्यातून येणाऱ्या दूधाकडे आंदोलकांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे दोन दिवसात राज्यात सुमारे एक कोटी 80 लाख लिटर दुधाची वाहतूक ठप्प झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात संपाची तीव्रता अधिक आहे. परराज्यातून येणारे दूध रोखण्यात येत आहे.

फत्तेसिंग नाईक, गोकूळ, संगमनेर येथील राजहंस, कराडमधील कोयना, बीड जिल्हा व तालुका दूध संघ, आष्टी तालुका दूध संघ, बाभळेश्‍वर व एस. आर. थोरात आणि प्रभात दूध संघांचे दूध संकलन अतिशय कमी झाले तर काहींनी संकलनच केले नाही. मुंबईसह पुण्यात येणारे दूध पोलिस बंदोबस्तात आणले जात असल्याची माहिती दुग्ध विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील शिवप्रसाद, शिवामृत आणि जिल्हा सहकारी संघांचे दूध संकलन दोन लाख लिटरने घटल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक तोडगा शासनाने काढावा, अशी मागणी पुढे येत आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, माढा, करमाळा यासह अन्य तालुक्‍यांमध्ये आंदोलकांनी दूध वाहतूक करणारी वाहने अडविली असून दूध वाहतूक सध्या ठप्पच आहे. 

80 लाख लिटर दुधाचा साठा 
राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ग्राहकांना दुधाचा तुटवडा जाणवू नये यासाठी सुमारे 80 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसापर्यंत तो पुरेल. तसेच, राज्यातील विविध ठिकाणांहून पोलिस बंदोबस्तात दूध शहरांमध्ये आणले जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना दुधाचा पुरवठा करणे शक्‍य असल्याचे दुग्ध विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: MilkAgitation near about 2 lakh liter milk supply stopped