#SataraFlood उद्या दूध, भाजीपालाची टंचाई दूर हाेईल : श्वेता सिंघल

उमेश बांबरे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारी वाहने कोणत्याही परिस्थितीत अडवून ठेऊ नयेत. पर्यायी मार्ग व व्यवस्था करून ही वाहने शहरांकडे जाण्यासाठी अधिकारी व पोलिसांनी प्राधान्य द्यावे.
- श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा. 
 

सातारा : पूर परिस्थितीमुळे आज (बुधवार) सातारा शहरात दूधाचा व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला हाेता. परंतु उद्यापासून (गुरुवार) दूध, भाजीपाला आणि गॅसचा तुटवडा जाणवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने कोणत्याही परिस्थितीत अडवून ठेऊ नयेत असा आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला आहे.
पुर ओसरत असतानाच रस्ते व महामार्गावरील वाहतूक बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा आज तुटवडा निर्माण झाला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पुरामुळे दुधाचे संकलन न झाल्याने दुध पुरवठा हाेऊ शकला नाही. परिणामी स्थानिक दूध संघातूनच दुधाचे वितरण सुरू  आहे भाजीपालाही ग्रामीण भागातून शहरात येऊ न शकल्याने त्याचा ही तुटवडा भासला. 
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे कर्‍हाड पाटणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रमुख महामार्गावर पुराचे पाणी आल्याने अवजड वाहने बंद करण्यात आली आहेत. पुरामुळे सांगली व कोल्हापूर येथून दूध घेऊन सातारा जिल्ह्यासह पुणे, मुंबईकडे येणार्‍या गाड्या जाऊ शकल्या नाहीत. 
दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा हाेऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारी वाहने कोणत्याही परिस्थितीत अडवून ठेऊ नयेत. पर्यायी मार्ग व व्यवस्था करून ही वाहने शहरांकडे जाण्यासाठी अधिकारी व पोलिसांनी प्राधान्य द्यावे असे सिंघल यांनी स्पष्ट केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk,vegetables will be available from tomorrow: Shweta Singhal