एमआयएमचा शहराध्यक्ष शेखवर प्रतिबंधात्मक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - बिंदू चौकातून विनापरवाना मोटारसायकलची रॅली काढण्यासाठी आलेल्या एमआयएमच्या शहराध्यक्षाला आज जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोल्हापूर - बिंदू चौकातून विनापरवाना मोटारसायकलची रॅली काढण्यासाठी आलेल्या एमआयएमच्या शहराध्यक्षाला आज जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शाहीद शहाजान शेख (वय 30, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. औरवाड (ता. शिरोळ) येथील पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार मुल्ला यांचा अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली बिंदू चौकातून निघणार होती. त्याला खुद्द मुस्लिम समाजासह इतर कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे बिंदू चौकात सकाळी तासभर तणावाचे वातावरण राहिले. जुना राजवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. या वेळी महापौर हसीना फरास यांच्यासह अन्य कार्यकर्ते बिंदू चौकात उपस्थित होते. 

एमआयएम पक्षाची शाखा कोल्हापुरात उघडण्यात आली आहे. त्याचा शहराध्यक्ष म्हणून रविवार पेठेतील शाहीद शेख काम पाहत आहे. सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे. यामध्ये औरवाड येथून अस्लम मुल्ला पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची मोटारसायकलची रॅली बिंदू चौकातून सुरू करण्याचे नियोजन शेखने केले होते. यासाठी सकाळी दहाच्या सुमारास साधारण आठ-दहा व्यक्ती मोटारसायकलवरून बिंदू चौकात जमले होते. एमआयएमचे कार्यकर्ते असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्यास मिळाली. बिंदू चौकात काही विपरीत घडू नये म्हणून तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे अनिल देशमुख फौजफौट्यासह दाखल झाले. या वेळी रॅलीसाठी थांबलेले तरुण निघून गेले. 

दरम्यान, माजी नगरसेवक आदिल फरास, नगरसेवक नियाज खान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान, जयकुमार शिंदे यांच्यासह पन्नास-साठ कार्यकर्ते बिंदू चौकात जमले होते. एमआयएमचे कोणी दिसल्यास ठोकून काढू, अशीच भूमिका त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली. याचवेळी आम्ही शाहू महाराजांच्या नगरीतील आहोत. येथे धर्माचा दुजाभाव करून कोणी फुटिरवादी काम करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही आदिल फरास यांनी पोलिसांसमोर स्पष्ट केले. येथे आलेला एमआयएमचा शहराध्यक्ष शाहीद शेख याला ताब्यात घेतल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिली. घडलेला प्रकार महापौर फरास यांना समजताच त्याही बिंदू चौकात आल्या. त्यांनी शांततेने घ्यावे, असे आवाहन सर्वांना केले; मात्र रॅलीच होणार नसल्याची खात्री झाल्याचे पोलिसांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर तणावाचे वातावरण निवळले. 

""शाहीद शहाजान शेख हा एमआयएमचा शहराध्यक्ष असल्याचे सांगतो. औरवाड येथील उमेदवार मुल्ला याच्या प्रचाराच्या रॅलीसाठी सर्वजण जमले होते. रॅलीबाबत कोणतीही परवानगी पोलिसांकडून घेतलेली नव्हती. म्हणून आम्ही त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.'' 
-अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा. 

Web Title: mim bindhu chowk kolhapur