वारकऱ्यांसाठी पंढरपुरात प्रथमच 15 लाख लिटर मिनरल वॉटर 

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : आषाढी प्रथमच यात्रेत श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून चार दिवस वारकऱ्यांना मोफत मिनरल वॉटर आणि बटाटा चिवडा पॅकेट देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीने काही संस्थांच्या मदतीने तब्बल 15 लाख लिटर मिनरल वॉटरची व्यवस्था केली आहे. यात्रेच्या तीन दिवसांच्या काळासाठी भाविकांचा विमा उतरवण्यात आला असून दुर्दैवाने कोणाचा अपघाती मृत्यू झाला अथवा जखमी झाल्यास संबंधितांना नुकसान भरपाई मिळणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी "सकाळ" शी बोलताना दिली. 

डॉ.अतुल भोसले यांची मागील वर्षी आषाढी एकादशी दिवशी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी वर्षभरातस वारकऱ्यांच्या सोईसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याप्रमाणे यंदाच्या आषाढीत वारकऱ्यांना जास्तीतजास्त सुविधा देण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. आज त्यांनी समितीच्या तयारीचा सर्वत्र फिरुन आढावा घेतला. 

श्री.भोसले म्हणाले, आषाढी यात्रेच्या वेळी सुमारे दहा ते बारा लाखाहून अधिक भाविक येतील या अंदाजाने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. यात्रेत काही वेळा दूषित पाणी पिल्याने भाविकांना त्रास होतो. हे लक्षात घेऊन भाविकांना मिनरल वॉटर देण्याचे नियोजन केले असून त्यासाठी काही संस्थांची मदत घेण्यात येत आहे. 20 जुलै ते 13 जुलै या चार दिवसात मिनरल वॉटर तसेच बटाटा चिवड्याची पॅकेट वितरीत केली जाणार आहेत. मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट , बस स्थानके, 65 एकर परिसर आदी भागात स्वयंसेवकांच्या माध्यमातून पाणी व बटाटा चिवडा वाटप केले जाणार आहे. 

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांची टिम मुबलक औषधांसह यात्राकाळात दर्शन रांगेच्या जवळ गरजू रुग्णांना तपासून औषधे देणार आहे. दशमी, एकादशी आणि व्दादशी या तीन दिवसाच्या काळात पंढरपूर आणि पाच किलोमीटर परिसरात दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास 3 लाख रुपये, कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 1 लाख रुपये आणि जखमी झाल्यास 50 हजार रुपयांची मदत वीमा कंपनीकडून दिली जाणार आहे. 

राज्याच्या विविध भागातून यंदा प्रथमच एक हजार स्वयंसेवक स्वच्छता आणि मंदिर समितीस आवश्‍यक असलेली मदत करणार आहेत. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी प्रशासनाने गोपाळपूर रस्त्यालगत 10 पत्राशेड उभारल्या आहेत. या पत्राशेड दर्शन रांगेतील भाविकांना तासन्‌तास उभे राहावे लागू नये म्हणून यावर्षी पत्राशेडमध्ये लाकडाचे मोठे वासे बांधून त्यावर भाविकांना बसता येईल अशी सोय केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com